कोथरुड परिसरातील मोहिते कॉलेज मैदानात एका अल्पवयीन मुलाचा खून करून मृतदेह पोत्यात बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. करण गोपाल राठोड (वय १४) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.
कोथरूडमधील एकलव्य चौक परिसरात मोहिते कॉलेजचे मैदान आहे. या ठिकाणी खेळत असलेल्या लहान मुलांना (गुरुवार) सायंकाळी मैदानात एका पोत्यामधे काहीतरी संशयास्पद असल्याचे दिसून आले. त्यांनतर ही माहिती कोथरुड पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी पोत्यामध्ये मृतदेह असल्याचे आढल्यानंतर त्याची ओळख पटविण्यात आली.
शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस वरिष्ठ निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.