Friday, November 8, 2024
Homeक्रीडाआजपासून आयपीएलचा थरार : पहिला सामना CSK विरुद्ध KKR

आजपासून आयपीएलचा थरार : पहिला सामना CSK विरुद्ध KKR

आयपीएलच्या पंधराव्या मोसमाची सुरुवात शनिवारपासून वानखेडे स्टेडियमवर होत असून पहिला सामना गतविजेते चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाईल. सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांनी गेल्या हंगामात अप्रतिम प्रदर्शन केले होते. कोलकाता नाईट रायडर्सने तर अंतिम फेरीत झेप घेतली होती. मात्र, चेन्नईने त्यांना पराभूत करून चौथ्यांदा आयपीएलचे अजिंक्यपद पटकावले होते.

आता हे गतविजेते आणि उपविजेते पहिल्याच सामन्यात आमने-सामने येत आहेत. त्यात बाजी कोण मारणार याचे कुतूहल रसिकांना लागून राहिले आहे. कोलकाता आणि चेन्नई या दोन्ही संघांकडे नवीन कर्णधार आहेत. केकेआरचे नेतृत्व श्रेयस अय्यर आणि सीएसकेच नेतृत्व रवींद्र जडेजा करतोय. केकेआरने श्रेयस अय्यरकडे कप्तानपद सोपवले आहे तर महेंद्रसिंग धोनीने रवींद्र जडेजाला संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.

आकड्यांवर नजर टाकली, तर चेन्नईची बाजू सरस आहे. दोन्ही संघांमध्ये एकूण 26 सामने झाले आहेत. यात 17 सामने चेन्नईने तर फक्त आठ सामने केकेआरने जिंकले आहेत. आयपीएल 2021 मध्ये चेन्नईने कोलकाता नाईट रायडर्सला दोन्ही लीग सामन्यांमध्ये पराभूत केले होते. चेन्नईने पहिला सामना सहा गडी राखून जिंकला, तर दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्सने दोन विकेटस्ने गमावला. अंतिम लढतीतही चेन्नईनेे कोलकाताला 27 धावांनी पराभूत केले होते. मात्र, सलामीच्या सामन्यांमध्ये चेन्नई संघाची कामगिरी खूपच खराब आहे. चेन्नईने आतापर्यंत उद्घाटनाचे 12 सामने खेळले आहेत. यात सहा सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. दुसर्‍या बाजूला कोलकाताने सलामीचे 14 पैकी 10 सामने जिंकले आहेत.

षटकारांचा विचार केला तर कोलकातासाठी आंद्रे रसेलने सर्वाधिक 140 षटकार ठोकले. रसेलने कोलकातासाठी 114 चौकार लगावले. तसेच चेन्नईसाठी धोनीने सर्वाधिक 189 षटकार लगावले आहेत. धोनी आयपीएलच्या या हंगामात आपले 200 षटकार पूर्ण करू शकतो. आयपीएल आणि चॅम्पियन्स लीग मिळून कोलकातासाठी ऑफ स्पिनर सुनील नरेनने सर्वाधिक म्हणजे 161 विकेटस् घेतल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वात जास्त 138 विकेटस् ड्वेन ब्राव्होने घेतल्या आहेत. त्याचवेळी चेन्नईसाठी सर्वात जास्त म्हणजे 98 झेल सुरेश रैनाने घेतलेत. विद्यमान कर्णधार रवींद्र जडेजाने 63 झेल घेतले असून कोलकाता कडून आंद्रे रसेलने सर्वाधिक 26 झेल पकडले आहेत.
या लढतीत दोन्ही संघांच्या कर्णधारांचा खर्‍या अर्थाने कस लागणार आहे.

रवींद्र जडेजा हा सध्या पूर्णपणे तंदुरुस्त असून त्याचा फॉर्मदेखील उत्तम आहे. त्याचवेळी केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर याच्याकडूनही लक्षवेधी कामगिरीची अपेक्षा आहे. दोन्ही संघांमध्ये तगडे खेळाडू असल्यामुळे हा पहिलाच सामना चुरशीने खेळला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वानखेडेची खेळपट्टीही ठणठणीत असल्यामुळे या सामन्यात चौकार आणि षटकारांची बरसात पाहायला मिळेल. मुख्य म्हणजे कोव्हिड काळ हळूहळू संपत चालला असला तरी स्टेडियममध्ये क्षमतेच्या पंचवीस टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. बाकीच्या रसिकांना टीव्हीवरूनच या सामन्याचा आनंद लुटता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -