सीएनजी गॅसवर वाहन चालवणाऱ्यांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे वाहन चालक त्रस्त झाले आहेत. अशामध्ये ज्यांच्याकडे सीएनजीवरील गाड्या आहेत त्यांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळणार आहे कारण महाराष्ट्र सरकारने सीएनजीवरील मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅटमध्ये 10 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यानुसार येत्या 1 एप्रिलपासून राज्यातील सीएनजीचे दर कमी होणार आहे. येत्या 1 एप्रिलपासून राज्यात सीएनजी प्रती किलो 7 ते 8 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. अशामध्ये महागाईच्या काळात कुठेतरी सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये घोषणा केल्याप्रमाणे सीएनजीवरील मूल्यवर्धित कराचा दर 13.5 टक्क्यांवरुन 3 टक्के इतका कमी केल्याची अधिसूचना शनिवारी जारी केली. म्हणजेच मूल्यवर्धित करामध्ये 10 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून ती राजपत्रात सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये सीएनजीवर 3 टक्के मूल्यवर्धित कर आकारला जाईल असे नमूद करण्यात आले आहे.
येत्या 1 एप्रिलपासून म्हणजेच शुक्रवारपासून हे नवीन दर लागू होणार आहेत. सीएनजी स्वस्त होणार असल्याचा फायदा रिक्षा, टॅक्सी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना तसेच त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही होणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे सीएनजीच्या दरात कपात झाल्याने प्रदूषण नियंत्रणास मदत होईल, असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवरचं उत्पादन शुल्क कमी केले होते. तेव्हापासून राज्यातही कर कमी करण्याची मागणी केली जात आहे. अर्थसंकल्पात नैसर्गिक वायूवरील कर 10 टक्के कमी करण्यात आला आहे. पण पेट्रोल डिझेलवरील करात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही फक्त सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार आहे.