ताजी बातमी ऑनलाइन टीम
‘तू जाड आहेस, मला आवडत नाही. मामांनी सांगितले म्हणून होकार दिला, पण मी हे लग्न मोडणार आहे. आता लग्न कुन्हे गावात नाही, तर भुसावळात लॉनवर करायचे’, अशा भावी पतीकडून येणाऱ्या धमक्या आणि अपमानाला कंटाळून लग्नाच्या बोहल्यावर चढण्याआधीच तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide )केल्याची धक्कादायक घटना घडली. रामेश्वरी रवींद्र नागपुरे ( वय २४, रा. कुन्हे, पानाचे, ता. भुसावळ) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
रामेश्वरीसारख्या उच्चशिक्षित तरुणीने घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याने संताप व्यक्त होत आहे. तिचा लग्न ठरलेला पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी रामेश्वरीचे आई -वडील शिरसोली येथे लग्नाला गेले होते. तर रामेश्वरी भुसावळ येथे जीमला गेली होती. दुपारी घरी आल्यावर तिने वडिलांना फोन केला. चार वाजता आई -वडील घरी आले असता आतून दरवाजा बंद होता. आवाज देऊनही रामेश्वरी दरवाजा उघडत नसल्याने तिचा चुलत भाऊ जीवन व इतरांनी दरवाजा तोडला. त्यावेळी आत रामेश्वरीने ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. दरम्यान, होणाऱ्या पती व सासू यांच्याकडून होणारा छळ, असह्य टोमणे व अवास्तव अपेक्षा यामुळेच मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप करून तिच्या वडिलांनी भुसावळ पोलिसांत लेखी तक्रार दिली. तेथून मृतदेह जळगावला शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. शनिवारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शवविच्छेदन रोखण्यात आले होते.पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.