सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एपीएमसीमधील व्यापारी व शेतकऱ्यांनी खासगी भाजी मार्केटच्या विरोधात अर्धनग्न अवस्थेत आंदोलन छेडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
3 जानेवारीपासून बेळगावमध्ये गांधी नगर जवळ खासगी भाजी मार्केट सुरू करण्यात आले. त्यामुळे केपीएमसीमध्ये कार्यरत असलेले 80 टक्के व्यापारी या नव्या भाजी मार्केटमध्ये स्थलांतर झाले. त्यामुळे एपीएमसीमध्ये खरेदी तत्वावर गाळे घेऊन व्यवसाय थाटलेले व्यापारी व शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.
खासगी मार्केट बंद व्हावे यासाठी एपीएमसीमध्ये सुमारे दीड महिने आंदोलन छेडण्यात आले. जिल्हाधिकारी, बेळगाव येथील एपीएमसी कार्यालय यांना निवेदन देऊन देखील हा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे सोमवारी एपीएमसीमधील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न अवस्थेत आंदोलन छेडत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी भाजीमार्केटच्या विरोधात कारवाई करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी मागितला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी भाजी मार्केटची पाहणीदेखील केली, मात्र अहवाल सादर केला नाही. असा आरोप व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर केला आहे. ताबडतोब खाजगी भाजी मार्केटच्या विरोधात पावले उचलून आम्हाला न्याय द्यावा. अशा आशयाचे निवेदन सोमवारी जिल्हाधिकार्यांना एपीएमसीमधील व्यापाऱ्यांतर्फे निवेदन सादर करण्यात आले.