नागपुरातील एका स्कूल बसवर कार्यरत असलेल्या महिला कंडक्टरची निर्घृण हत्या (murder) झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारपासून बेपत्ता असलेल्या ४१ वर्षीय महिला कंडक्टरचा मृतदेह प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून उप्पलवाडी रोडवर फेकल्याचे दिसून आले आहे. कपीलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली आहे. दिपा दास असे या मृत महिलेचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नागपुरातील समर्थनगरात ही महिला वास्तव्यास होती. हिचे पती एमआयडीसी भागात एका स्टील कंपनीत काम करतात. तिला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी ही कंडक्टर महिला शाळेत गेली होती. शनिवारी उशिरा रात्रीपर्यंत ही महिला घरी आली नाही, म्हणून हिच्या परिवारातील सदस्यांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
परत येईल म्हणून कुटुंब झोपी गेले. मात्र, ही महिला परत आलीच नाही. दोन दिवसानंतर उप्पलवाडीकडे जाणार्या महामार्गावर प्लास्टिकच्या बॅग मध्ये एका महिलेचा (murder) मृतदेह आढळून आल्याची माहिती कपीलनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. कंडक्टरच्या पोषाखातील मृतदेह पाहिल्यानंतर बेपत्ता झालेली तीच महिला कंडक्टर असल्याची पोलिसांची खात्री पटली. शनिवारपासून ते सोमवार पर्यंतच्या काळात तिची हत्या गळा आवळून केल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत आढळून आले आहे. त्यानंतर तिचा मृतदेह प्लास्टिकमध्ये गुंडाळून फेकण्यात आल्याचा निष्कर्ष पोलिसांनी वर्तविला आहे.
शनिवारी दुपारी २ च्या सुमारास कंडक्टर महिलेला कुशीनगर येथे चालकाने उतरविले होते. त्यानंतर ती बेपत्ता झाली होती. तिच्या मोबाईल क्रमांकावर आलेले फोन कॉल्सच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, हा श्वान काही अंतरावरच थांबला. त्यामुळे वाहनातून या महिलेचा मृतदेह आणून टाकला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.