Sunday, December 22, 2024
Homeक्रीडागुजरातची ‘सुपर’ सलामी ; लखनौवर मात

गुजरातची ‘सुपर’ सलामी ; लखनौवर मात

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मोेहम्मद शमीच्या (IPL 2022) (25 धावांत 3 विकेटस्) भेदक मार्‍यानंतर राहुल तेवातिया (नाबाद 40) व हार्दिक पंड्या (33) तसेच डेव्हिड मिलरच्या (30) यांच्या उपयुक्त फलंदाजीच्या बळावर गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जॉयंटस्वर पाच विकेटस्ने मात केली. याबरोबरच हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील नवा संघ गुजरातने आयपीएल 2022 मध्ये विजयी सलामी देत आपल्या मोहिमेस सुरुवात केली.



लखनौने (IPL 2022) दिलेले 159 धावांचे टार्गेट गुजरातने 19.5 षटकांत 5 बाद 161 धावा काढत पार केले. गुजरातचीही सुरुवात निराशाजनक झाली. शुभमनने (0) चमिराने टाकलेल्या पहिल्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर हुडाकडे झेल दिला. चमिराने दुसरा धक्का देताना विजय शंकरला (4) त्रिफळाबाद केले. त्यानंतर कर्णधार हार्दिक व मॅथ्यू वेड यांनी संघाला सावरत तिसर्‍या विकेटसाठी 43 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. ही जम बसलेली जोडी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच कृणालने भाऊ हार्दिकला 33 धावांवर मनीष पांडेकरवी झेलबाद केले. तर हुडाने धोकादायक वेडचा (30) अडथळा दूर केला.

शेवटच्या 6 षटकांत गुजरातला (IPL 2022) 71 धावांची गरज होती. मिलर व तेवातियाने 16 व्या षटकात 22 धावा काढून हे चेंडू व धावा यांच्यातील अंतर कमी केले. आवेश खाने ही जोडी फोडताना मिलरला (30) राहुलकरवी झेलबाद केले. यावेळी गुजरातला 15 चेंडूंत 21 धावांची गरज होती. शेवटी तेवातिया (नाबाद 40) व अभिनव मनोहर (नाबाद 15) यांनी आक्रमक फटकेबाजी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना लखनौने (IPL 2022) 20 षटकांत 6 बाद 158 धावा केल्या. लखनौचा कर्णधार केएल राहुलला (0) शमीने पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वेडकरवी झेलबाद केले. पाठोपाठ डिकॉकलाही (7) शमीने त्रिफळाबाद करत दुसरा धक्का दिला. त्यानंतर अ‍ॅरोनने लखनौला तिसरा धक्का देताना एविन लेविसला (10) शुभमनकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर शमीने मनीषचा (6) त्रिफळा उडवत लखनौची 4 बाद 29 अशी स्थिती केली. मात्र, दीपक हुडा व आयुष बदोनी यांनी डाव सावरला. हुडाने 36 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. यात त्याच्या 5 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता.

हुडाला रशिद खानने पायचित केले. 41 चेंडूत 6 चौकावर व 2 षटकारांसह 55 धावा काढून हुडा परतला. त्याने बदोनीसोबत पाचव्या विकेटसाठी 87 धावांची भागीदारी केली. 17 व्या षटकाअखेर लखनौ 5 बाद 124 अशा समाधानकारक स्थितीत होता. बदोनी व कृणाल यांनी शमीने टाकलेल्या 18 व्या षटकात 15 धावा वसूल केल्या. दरम्यान, बदोनीने आपले अर्धशतक 38 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने पूर्ण केले. बदोनी 54 धावांवर बाद झाला. तर कृणाल 21 धावांवर नाबाद राहिला. लखनौने 20 षटकांत 6 बाद 158 धावा केल्या. मो. शमीने 3 तर वरुण अ‍ॅरोनने 2 विकेटस् घेतल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -