ताजी बातमी ऑनलाईन टीम
पन्हाळा मुख्य रस्ता 15 एप्रिलपासून वाहतुकीस खुला होईल, अशा पद्धतीने काम सुरू आहे. पन्हाळ्याकडे जाणारा मुख्य रस्ता जून 2021 मध्ये पूर्णत: खचला. भूस्खलन झाल्याने तो दोनशे फूट खोल तुटला. पन्हाळगडावर येण्यासाठीचा मुख्य मार्ग बंद झाल्याने पन्हाळ्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. गेले वर्षभर येथील नागरिक रस्ता लवकर पूर्ण करावा, अशी मागणी करत आहेत.
पन्हाळा रस्ता बांधणीचे काम केर्लेचे सुपुत्र व पाटबंधारे बांधकाम व्यावसायिक शिवाजी मोहिते यांनी घेतले आहे. पन्हाळ्याची ओढ, ऐतिहासिक पन्हाळगडचा रस्ता बांधणी करायला मिळतो आहे तर आपण जरूर योगदान द्यायचे, हा मनस्वी संकल्प आणि जोखीम असणारे काम करण्याची आवड असल्याने पन्हाळ्याचा मुख्य रस्ता बांधण्याचे काम स्वीकारले, असे शिवाजी मोहिते यांनी सांगितले. शिवाजी मोहिते हे इरिगेशनचे काम करतात. कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रथितयश कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांचा लौकिक आहे. पन्हाळा रस्ता बांधणीचे काम बाहेरील कॉन्ट्रॅक्टरने करावे, हे मनाला रूचले नाही आणि त्यातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनीही शिवाजी मोहिते हेच आव्हानात्मक असे पन्हाळ्याचे काम करतील, असा विश्वास व्यक्त केल्याने आपण हे काम स्वीकारले आहे. पन्हाळ्याचा मुख्य रस्ता बांधण्याचे काम सुरू केले तेव्हा कसे सुरू करावे, हेदेखील आव्हान होते. लाखो रुपयांचे मशिन पडलेला रस्ता स्वच्छ करण्यासाठी या ठिकाणी सोडायचे होतेे. ऑपरेटरला सुरक्षा जॅकेट घालून मशिनवर बसवले आणि त्याला सांगितले की, जेव्हा धोका संभवतो असे वाटेल तेव्हा मशिन सोडून दे, जे होईल ते होईल; पण सुदैवाने असे काही घडले नाही.
पन्हाळ्याचे स्थानिक नागरिक व पन्हाळा पालिकेचे सहकार्य, यामुळे या ठिकाणी गतीने काम करता आले. खचलेल्या रस्त्याच्या मधून तळ्याचे पाणी वाहत होते. या पाण्याचे दोन प्रवाह सापडले होते; पण नागरिक तिसरा प्रवाह आहे, असे सांगत होते. परंतु, ती गटार मिळत नव्हती, मुजली होती, तळ्यात उतरून पाण्यात रंग टाकून प्रयोग केले; पण काही उपयोग झाला नाही आणि काम करत असताना एक दिवस एक मोरी उघडी झाली. ती पूर्णत: बंद होती, तीही स्वच्छ केली. पन्हाळ्याचा मुख्य रस्ता अत्यंत सुरक्षित कसा बांधता येईल याचा सातत्याने प्रयत्न आपण केला आहे, असेही शिवाजी मोहिते यांनी सांगितले. या व्यवसायात असल्याने अनेक कामे केली; पण मुंबई येथे डिझाईन सर्कलला कधी जाण्याचा योग आला नव्हता. पन्हाळ्याचा रस्ता बांधणीच्या कामामुळे शासनाच्या या विभागाचे अधिकारी आणि त्यांचे प्रत्यक्ष चालणारे काम पाहण्याचादेखील योग आला, असेही मोहिते म्हणाले.
पन्हाळ्याचा रस्ता शंभर फूट उंच बांधून घेतला आहे, हे काम जिओ ग्रेड पद्धतीने करण्यात आले आहे. दोन आठवड्यांत हा रस्ता सुरू करण्याचा मानस आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू करणार असून, नंतर हा रस्ता सिमेंटने बांधणार आहे, असेही शिवाजी मोहिते म्हणाले. सध्या खडी मिळत नाही, रॉयल्टीचा प्रश्न उपस्थित झाला आहे, ज्या पद्धतीने या ठिकाणी खडी हवी तशी खडी आसुर्ले-पोर्ले येथील बाबासाहेब पाटील यांनी उपलब्ध करून दिली आहे. एकूण सहा कोटींचे हे काम मंजूर आहे; मात्र हे काम वाढत असून, किमान आठ कोटींपर्यंत खर्च जाईल, असे ते म्हणाले.