आपल्याकडे एक म्हण आहे, ‘तेलही गेले आणि तूपही’, अशीच अवस्था स्ध्या सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनची झाली आहे. एक म्हणजे राजस्थान रॉयल्सविरुद्धचा पहिला सामना हरल्याचे दु:ख आणि दुसरे म्हणजे या सामन्यात झालेल्या चुकीची मोठी किंमत त्याला मोजावी लागली आहे. सनरायझर्सचा कर्णधार केन विल्यमसनची ही चूक अगदी तशीच होती, जी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मानेही आयपीएल 2022 च्या पहिल्या सामन्यात केली होती आणि रोहितने त्याची शिक्षाही भोगली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी केन विल्यमसनला दंड ठोठावण्यात आला आहे. रोहित शर्माला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.
आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनचे स्लो ओव्हर रेटचे हे पहिलेच प्रकरण असल्याने त्याला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या चूकीची पुनरावृत्ती झाल्यास दुप्पट दंड आणि बंदी अशा तरतुदी आहेत.
राजस्थान रॉयल्सने मंगळवारी दमदार खेळाचं प्रदर्शन केलं. त्यांनी यंदाच्या सीजनमधील 210 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. याआधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे 206 धावांचे लक्ष्य पंजाब किंग्सने पार केलं होतं. सनरायजर्स हैदराबादला तशी कामगिरी करुन दाखवणं जमलं नाही. राजस्थान रॉयल्सने त्यांचा 61 धावांनी पराभव केला व आयपीएलमध्ये विजयी शुभांरभ केला. राजस्थानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायजर्स निर्धारीत 20 षटकात सात बाद 149 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही विभागात सरस खेळ दाखवला. सलामीवीर यशस्वी जैसस्वालपासून शिमरन हेटमायरपर्यंत प्रत्येकाचा तडाखेबंद खेळ पहायला मिळाला.
राजस्थान रॉयल्सला सुरुवात चांगली मिळाली. भुवनेश्वर कुमारच्या नो बॉल मुळे जॉस बटलरला बाद असूनही एक संधी मिळाली. त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला. बटलरने उमरान मलिकच्या एका ओव्हरमध्ये 21 धावा चोपल्या. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या षटकात 18 धावा काढल्या. तिथून राजस्थानने सामन्यावर जी पकड मिळवली, ती शेवटपर्यंत कायम टिकवली. जॉस बटलर आणि यशस्वी जैस्वालने पहिल्या विकेटसाठी 58 धावांची सलामी दिली.