ताजी बातमी ऑनलाईन टीम
नवी दिल्ली: व्हॉटसअॅप, इन्स्टाग्राम आणि गेमिंगमुळे अनेक विद्यार्थ्यांना (students) नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या अॅडिक्शनपासून कसे दूर राहायचे याचा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी विद्यार्थ्यांना दिला. सोशल मीडिया आणि मोबाईल गेमिंगच्या अॅडिक्शनपासून वाचण्याचे उपाय आहेत. मोबाईल किंवा लॅपटॉपच्या आत घुसण्याची जेवढी मजा आहे, तेवढीच मजा स्वत:चा शोध घेण्यात आहे. स्वत:च्या आत डोकावण्यात आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन राहण्याऐवजी इनरलाईन राहिलं पाहिजे. एकाग्र होऊन अभ्यास केला तर तुम्ही मोबाईल अॅडिक्शनपासून दूर राहाल, असा कानमंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ (Pariksha Pe Charcha) या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांची प्रश्न जाणून घेतली आणि छोट्या छोट्या उदहारणातून सोप्या भाषेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. एवढेच नव्हे तर परीक्षेच्या काळात तणावापासून कसे दूर राहायचे आणि अभ्यासाचे नियोजन कसे करायचे याचा सल्लाही मोदींनी विद्यार्थ्यांना दिला.
खेळल्याशिवया तुमचा विकास होऊ शकत नाही. आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या आव्हानाचा सामना करण्याचं आपण शिकतो. आपण जी पुस्तके वाचतो, खेळाच्या मैदानातही त्या पुस्तकातील धडे आपण शिकू शकतो. खरे तर आपल्याकडे शिक्षण आणि खेळ या दोन गोष्टी एकमेकांपासून दूर ठेवल्या गेल्या आहेत. परंतु आता बदल होणार आहे. लवकरच हा बदल झालेला तुम्हाला दिसेल. त्यासाठी तुम्ही तयार राहा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
यावेळी मोदींनी तणावापासून कसे दूर राहायचे याचा कानमंत्रंही विद्यार्थ्यांना दिला. परीक्षा हा जीवनाचा एक छोटा आणि सहज भाग आहे हे मनात पक्क करा. आपल्या विकास यात्रेतील या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यातून आपण यापूर्वीही गेलो आहोत. या पूर्वीही अनेकदा आपण परीक्षा दिल्या आहेत. आपण अनेक परीक्षा दिल्यात, तशीच ही एक परीक्षा आहे हे लक्षात आलं तर एक्झामसाठी हा अनुभव आपली ताकद बनते, असं मोदी म्हणाले.