ताजी बातमी ऑनलाईन टीम
सनरायजर्स हैदराबाद (Hyderabad vs LSG) संघाच्या पराभवाची मालिका यंदाचा हंगामातही कायम असल्याचे पुन्हा एकदा पहायला मिळाले. एका वेळी हैदराबाद सहज जिंकेल असे वाटत असताना त्यांना पुन्हा पराभवाला समोरे जावे लागले. लखनौचा गोलंदाज आवेश खान याने टाकलेले १८ व्या षटकाने सामन्याचा निकाल बदलला. निकोलस पुरन आणि वॉशिंग्टन सुंदर यांची जोडी जमलेली असताना आवेश खानने निकोलस पुरन आणि त्याच्या नंतर आलेल्या अब्दुल समदला पाठोपाठ बाद करुन सामना लखनौच्या पारड्यात झुकवला. अखेर सुंदरला काही करता आले नाही. शेवटच्या षटकात जेसन होल्डर याने तीन वीकेट घेत लखनौचा विजय निश्चित केला.
लखनौ सुपर जायंटसने (Hyderabad vs LSG) दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघाची सुरुवात देखिल फारशी चांगली झाली नाही. चौथ्या षटकात कर्णधार केन विल्यमसन अवघ्या १६ धावांवर (चेंडू १६) बाद झाला. तसेच त्याचा दुसरा साथिदार अभिषेक शर्मा देखिल त्याच्या पाठोपाठ १३ धावांवर (चेंडू ११) बाद झाला. राहूल त्रिपाठीने काही काळ संघर्ष करण्याचा प्रयत्न केला. त्याने मार्करम सोबत छोटी भागिदारी देखिल रचली. पण, मार्करमला या सामन्यात फारसा प्रभाव दाखवता आला नाही. एडन मार्करम १२ धावांवर (चेंडू १४) बाद झाला. मार्करम नंतर राहूल त्रिपाठी देखिल ४४ धावांची (चेंडू ३०) खेळी करुन माघारी परतला. यानंतर निकोलस पुरन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
सनरायजर्सचे (Hyderabad vs LSG) फलंदाज ठराविक अंतरावर बाद होते. त्यांना मोठी खेळी करता आली नाही. पण, ते सामन्यात कायम होते. निकोलस पुरन याने काही मोठे फटके खेळत हैदराबादच्या आशा पल्लवीत ठेवल्या होत्या. वॉशिंग्टन देखिल एकेरी दुहेरी धावा घेत त्याला साथ देत होता. हैदराबादला जिंकण्यासाठी १० च्या रनरेटने धावांची आवश्यकता होती. पण, १५ व्या षटकानंतर लखनौच्या गालंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. रवी बिश्नोईने १६ वे आणि अँड्र्यू टायने १७ वे षटक टाकत चांगली गोलंदाजी केली. १८ व्या षटकात आवेश खान गोलंदाजीसाठी आला. त्याच्या पहिल्या चेंडूवर निकोलस पूरनने षटकार ठोकला. तसेच तिसऱ्या चेंडूवर पुन्हा मोठा फटका मारण्याच्या नादात सीमारेषेवर निकोलस पुरन ३४ धावांवर (चेंडू २४) झेल देऊन बाद झाला. आवेशने पुढच्या चेंडूवर अब्दुल समद या नव्या फलंदाजाला किपरकडे झेल द्यायला भाग पाडले. एकापाठोपाठ दोन फलंदाज बाद झाल्याने हैदराबादने सामना इथेच गमावला.