Friday, July 25, 2025
Homeमहाराष्ट्रमशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन पुणे मनसेत अंतर्गत वाद! वसंत मोरे नाराज, मनसे मात्र...

मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन पुणे मनसेत अंतर्गत वाद! वसंत मोरे नाराज, मनसे मात्र भूमिकेवर ठाम

ताजी बातमी ऑनलाईन टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडला. इतकंच नाही तर मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुनही राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे पुण्यातील मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर मशिदीतील भोंगे (Mosque Loudspeaker) काढण्यावरुन आता पुणे शहर मनसेत अंतर्गत वाद पाहायला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याला प्रत्युत्तर म्हणून हनुमान चालिसा लावण्याच्या आदेशाबाबत मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी नाराजी व्यक्त केलीय. तर मोरे यांची ती वैयक्तिक भूमिका असल्याचं मनसेकडून सांगण्यात आलंय. राज ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका सर्वांना मान्य आहे. वसंत मोरे यांचा काहीतरी गोंधळ झाला असल्याचं मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत संबुस यांनी म्हटलंय.



मशिदीवरच्या भोंग्याविरोधात राज ठाकरेंनी शिवतीर्थावरुन एल्गार तर केला. मात्र त्याच एल्गाराचे साईड इफेक्ट पक्षात उमटू लागले आहेत. पुण्यातल्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊ केले आहेत. विकासाच्या ब्लु प्रिंटवरुन थेट भोंगे हटवण्यापर्यंत भूमिका का बदलली, असे प्रश्न मनसेचे काही पदाधिकारी विचारत आहेत. वसंत मोरेंनी तर थेट त्यांच्या प्रभागात लाऊड स्पीकर न लावण्याचं सांगून अप्रत्यक्षपणे पक्षाचा आदेश झुगारुन लावलाय.

वसंत मोरेंची नेमकी अडचण काय?
मनसेच्या भूमिकेमुळे वसंत मोरेंची अडचण नेमकी काय आहे, ती सुद्दा समजून घेणे गरजेचे आहे. कात्रजमधून वसंत मोरे गेल्या 10 वर्षांपासून नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. वसंत मोरे जातीनं मराठा आहेत. मात्र त्यांच्या प्रभागातला मुस्लिम मतदार मनसेऐवजी वसंत मोरेंच्या कामामुळे त्यांच्या पाठिशी राहिला आहे. कात्रज प्रभागात मुस्लिमांची 3 हजार 800 मतं आहेत आणि हीच मतं गेमचेंजर ठरतात.

साईनाथ बाबरांचीही गोची
कोंढव्यातले साईनाथ बाबर पुण्यातले मनसेचे दुसरे नगरसेवक आहेत. साईनाथ बाबरही जातीनं मराठा आहेत आणि कोंढव्यात 70 टक्के मतदान मुस्लिमांचं आहे. या घडीला पुण्यातल्या 8 मतदारसंघापैकी मनसेची सर्वाधिक ताकद हडपसर, कोथरुड आणि त्यानंतर कसबा मतदारसंघात आहे. सध्या पुण्यात मनसेचे जे दोन नगरसेवक आहेत, ते दोघं निवडून येण्यात मुस्लिम मतांचा वाटा मोठा राहिला आहे. पक्षाच्या पडत्या काळातही जे राज ठाकरेंसोबत राहिले, त्यात बाळा नादगांवकर, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि वसंत मोरेंसारख्या नेत्यांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -