ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर शहर परिसराला सलग दुसऱ्या दिवशी बुधवारी वळीव पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी गारांचा सडा पडला. काही ठिकाणी झाडेही पडली. आणखी दोन दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.
सायंकाळी शहराच्या दक्षिणेकडील परिसरात धुवाँधार पाऊस झाला. विजेचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसाबरोबरच गारांचाही वर्षाव झाला. जोरदार पावसाने छोट्या रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते, त्यासोबत कचराही मोठ्या प्रमाणात वाहताना दिसत होता. पावसाने काही काळ जनजीवनावर परिणाम झाला. सुमारे
तासाभरानंतर पावसाने विश्रांती घेतली. शहराच्या मुख्य परिसरात सायंकाळी वातावरण ढगाळ झाले. काही ठिकाणी तुरळक सरींचा शिडकावा झाला. मात्र, त्यानंतर पावसाने हुलकावणीच दिली. आज शहरात ३६ अंश इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली तर गेल्या २४ तासात शहरात ७ मि.मी.पावसाचीही नोंद झाली.