मुलींच्या गरिबीचा फायदा घेऊन त्यांना वेश्या व्यवसायात आणणार्या तसेच एका मुलीची विक्री करणार्या टोळीला न्यायालयाने दोषी ठरवून सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. पुण्यात डी.जे. ऑपरेटिंगचे शिक्षण घेणार्या नेपाळी मुलीची या टोळीतील महिलांनी विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर दुसरी मुलगी वडिलांच्या आजारपणामुळे यामध्ये ओढली गेल्याचे कारण समोर आले आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी आरोपी सरिता रणजित पाटील (वय 41, रा. पाचगाव, करवीर), मनीषा प्रकाश कट्टे (30, रा. भोसलेवाडी, कोल्हापूर), विवेक शंकर दिंडे (31, रा. राजारामपुरी) या तिघांना 10 वर्षे सक्तमजुरी व 29 हजार रुपये दंड ठोठावला, तर वैभव सतीश तावसकर (28, रा. पांगरी, सोलापूर) याला दोन वर्षे सक्तमजुरी व 4 हजारांचा दंड ठोठावला आहे.
सरिता पाटील ही कळंबा येथील महालक्ष्मी निवास अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये कुंटणखाना चालवत होती. तर विवेक दिंडे व वैभव तावसकर हे गरजू व असहाय महिलांना वेश्या व्यवसायासाठी सरिता पाटीलकडे घेऊन येत होते. 2019 मध्ये करवीर पोलिसांनी या कुंटणखान्यावर छापा टाकून पीडित मुलीची सुटका केली होती.