गुढी पाडव्याच्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे, मदरशांमधले गैरप्रकार आणि हनुमान चालिसा आदी विविध मुद्यांवर आपली भूमीका मांडली होती. त्या पार्श्वभूमीवर ठाण्यात ९ एप्रिलला होणाऱ्या मनसेच्या जाहीर सभेकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहासमोर असलेल्या रस्त्यावर सभा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नौपाडा पोलीस ठाण्यात परवानगी अर्ज दिला होता. मात्र ठाणे पोलिसांनी या सभेस परवानगी नाकारण्यात येत असल्याचा शेरा या अर्जावर दिला आहे. मात्र यानंतर पोलिसांनी जाहीर सभेस परवानगी दिली आहे.
राज ठाकरेंच्या सभेला गर्दी होण्याची शक्यता असून, गडकरी रंगायतन समोरील रस्त्यावर सभा आयोजित करण्याची परवानगी मनसेने मागितली होती. ते ठिकाण रहदारीचा मार्ग आहे. त्यामुळे निर्माण होणारी वाहतुकच्या कोंडीच्या समस्येचा विचार करता या सभेस परवानगी देता येणार नाही, पाेलिसांनी स्पष्ट केले होते.
त्यानंतर ठाणे पोलिसांनी मनसेच्या स्थानिक नेत्यांना पर्यायी जागेवर सभा घ्यावी असा उपाय सुचवला होता. त्यानुसार मनसेच्या स्थानिक नेत्यांसोबत पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांची बैठक आज (गुरुवार) सकाळी पार पडली असून, या बैठकीत मनसेने ही सभा पर्यायी जागेवर घेण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार आता ही सभा नौपाडा पोलीस ठाण्याच्याच हद्दीत असलेल्या गजानन महाराज मठ चौकात होणार आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.