ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई: क्रिकेटच्या खेळात ग्राऊंडसमन (Groundsman) सुद्धा महत्त्वाचे असतात. खेळपट्टी, मैदान बनवण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. यंदाच्या आयपीएलमध्ये ग्राऊंडसमनच नशीब सुद्धा पालटलं आहे. 57 वर्षांचे वसंत मोहिते वानखेडे स्टेडियमवर ग्राऊंडमन म्हणून काम करतात. मरीन ड्राइव्ह किनाऱ्याजवळ असलेल्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आपल्याला कधी रहायला मिळेल, असा विचार सुद्धा त्यांनी केला नव्हता. पण यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये ते स्वप्न साकार झालं आहे. प्रसिद्ध चॉकलेट कंपनी कॅडबरीने (Cadbury) वानखेडेच्या ग्राऊंड स्टाफची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. क्रिकेटमध्ये ग्राऊंड स्टाफ सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. कॅडबरीने त्यांच्या कार्याची दखल घेतली. मासाबा या सेलिब्रिटी डिझायनरने तयार केलेला गणवेश त्यांना देण्यात आला आहे. हॉटेलमधून ग्राऊंड आणि तिथून पुन्हा हॉटेलमध्ये येण्यासाठी वानखेडेच्या ग्राऊंडस्टाफसाठी खास बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
आता रुममधून अरबी समुद्र दिसतो
आयपीएल सुरु होण्याआधी आमच्या रहाण्याची फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात येईल, अशी चर्चा होती. पण त्यावर विश्वास नव्हता. त्यानंतर एक दिवस मुंबई क्रिकेट असोशिएशनने कॅडबरीने आमच्या निवासाची फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये व्य़वस्था केल्याची माहिती दिली. “आयपीएलचा सीजन संपेपर्यंत पुढचे दोन महिने ते आमचे कपडे, जेवणाची व्यवस्था करणार असल्याचं सांगण्यात आलं” असं वसंत मोहिते यांनी सांगितलं. सध्या वसंत मोहिते रहात असलेल्या रुममधून अरबी समुद्राच दर्शन होतं.
मच्छरांमुळे वारंवार रात्रीची झोप मोड व्हायची
आज फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रहातोय. पण त्याआधी दिवस किती कठीण होते, ती आठवण वसंत मोहिते यांनी सांगितली. “सामने रात्री उशिरा संपायचे. त्यामुळे रात्रीचं घरी जाता येत नव्हतं. त्यावेळी दिवेचा स्टँडखाली असलेल्या छोट्याशा खोलीत रात्र काढावी लागायची. तिथे मच्छरांमुळे वारंवार रात्रीची झोप मोड व्हायची” असं वसंत यांनी सांगितलं.
तेव्हा MCA कडून डबल पैसे मिळतात
“सामने रात्री उशिरा संपायचे. त्यावेळी ट्रेन बंद असायच्या. मैदानातील छोट्याशा खोलीत आम्ही रात्र काढायचो. ज्या दिवशी सामने नसतात, त्यावेळी आम्ही सकाळी नऊ वाजता स्टेडियमवर येऊन संध्याकाळी सहा वाजता निघतो. सामन्याच्यादिवशी आम्ही लवकर येतो. आम्ही रात्री उशिरापर्यंत काम केलं, तर एमसीएकडून डबल पैसे दिले जायचे” असं वसंत म्हणाले.
लाइट पेटवण्यासाठी स्विच शोधावा लागतो
आता नव्या रुममध्ये त्यांना वेगळ्याच चिंता आहेत. लाइट पेटवण्यासाठी स्विच शोधावा लागतो. तो सहजासहजी सापडत नाही, असं त्यांनी सांगितलं. आता रात्रीची चांगली झोप लागते. पण बिछाना खूपच मऊ असल्याचं त्यांनी सांगितलं. “आता ड्रेसिंग रुमकडे जाण्याचा अनुभव सुद्धा वेगळा असतो. आमची स्वत:ची बस आहे. जी आम्हाला स्टेडियमवर सोडते. माझ्याकडे शब्द नाहीत. मी फक्त थँक्यू म्हणू शकतो” असं ग्राऊंडसमन वसंत मोहिते म्हणाले.