ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीकडून जप्त करण्यात आलीय. या कारवाईनंतर संजय राऊत अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. राऊत यांनी भाजपवर पलटवार करत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर गंभीर आरोप केलाय. INS विक्रांतसाठी गोळा केलेले 58 कोटी रुपये हडप केल्याचा आरोप राऊतांनी केलाय. या पार्श्वभूमीवर संजय राऊत आज दिल्लीहून मुंबईत दाखल झाले. त्यावेळी मुंबई विमानतळावर शिवसेना आमदार सुनील प्रभू, आमदार सुनील राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी राऊतांचं जंगी स्वागत केलं. यावेळी ढोल ताशाच्या गजर आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राऊतांच्या या स्वागतावरुन आता भाजप नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येतेय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विटरद्वारे राऊतांवर जोरदार निशाणा साधत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा खोचक सवाल केलाय.
संजय राऊत यांचं मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी जंगी स्वागत केलं. या स्वागतावरुन नारायण राणे यांनी राऊत आणि शिवसेनेवर खोचक टीका केलीय. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र?? काळा पैसा मिळवायचाय, अन् कारवाई झाली की बोंबलायचं.. त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा? संजय राऊत यांचं लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर?’ असं ट्वीट नारायण राणेंनी केलंय.
बुधवारी संजय राऊत अनेक आरोप करत किरीट सोमय्या यांना पुन्हा एकदा मीडियासमोर शिवीगाळ करताना दिसून आले होते. त्यानंतर आज शिवसैनिकांकडून ही स्वागताची तयारी करण्यात आली होती. संजय राऊत विमानतळावर पोहोचण्याच्या आगोदरच मोठ्या संख्येने शिवसैनिक विमानतळावर दाखल झाले होते. संजय राऊत विमानतळावर दाखल होताच संजय राऊतांवर जोरदार पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांच्या हातात योद्धे असे फलक संजय राऊत यांच्या फोटोसह दिसून आले. त्यानंतर शिवसेनेची ही रॅली निघाली. शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनावर भाजप नेत्यांनी मात्र सडकून टीका केली आहे.