ताजी बातमी ऑनलाईन टीम
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातील काही कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. ८) राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी दगडफेक करत हल्ला केला. या हल्ल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली. या हल्ल्याचा सर्वस्तरातून निषेध होऊ लागला आणि पुन्हा एकदा प्रसारमध्यमांच्या केंद्रस्थानी ॲड.गुणरत्न सदावर्ते आले. मराठा आरक्षणाला विरोध ते एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन यामध्ये ॲड. गुणरत्ने सदावर्ते यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. तसेच या सर्वांमध्ये सदावर्ते यांनी नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वारंवार टिका केली आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आजच्या अवस्थेला शरद पवारच जबादार असल्याची टिका त्यांनी अनेक वेळा केली आहे.
मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिकाकर्त्यांची बाजू न्यायालयात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली होती. तेव्हा सदावर्ते हे प्रकाशझोतात आले होते. ॲड. जयश्री पाटील यांनी ती याचिका दाखल केली होती. ॲड. जयश्री पाटील या सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. सदावर्ते यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे आणि हे आरक्षण असंवैधानिक असल्याचे त्याचे मत आहे. मूळचे नांदेडचे असणारे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी विविध सामाजिक चळवळींमध्ये काम केले आहे. त्यांनी भारतीय राज्यघटनेवरती पीएचडी केली आहे. त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नाच्या याचिकेची बाजू न्यायालायात मांडली आहे.
एसटी कर्मचारी आंदोलनात उडी
ऑक्टोबर पासून एसटी कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यासाठी आंदोलन सुरु झाले. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केले. पुढे या आंदोलनात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी उडी घेतली. यानंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनातून काढता पाय घेतला व आंदोनाचे नेतृत्व ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे आले. सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. गुरुवारी उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेत कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले. तसेच कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी, निवृत्ती वेतन देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.