राज्याकडून अपेक्षा न करता केंद्राच्या विविध योजना कोल्हापुरात आणून शहराचा विकास करण्याची ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. विमानतळ विस्तारीकरण रेल्वेच्या सुविधा यासह अन्य आणि विकास कामासाठी पाठपुरावा असेही ते म्हणाले. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने ‘वचननामा’ प्रसिद्ध केला त्यावेळी ते बोलत होते.
पाईपलाईनद्वारे घरोघरी गॅस पुरवठा, इलेक्ट्रिक बसेस, शेतमालाला उठाव देण्यासाठी ‘किसान रेल’, ‘कार्गो हब’ विमान यासारख्या अधुनिक संकल्पनांसह महापूर स्थितीवर उपाय-योजना म्हणून महामार्गावर फ्लाय ओव्हर, बास्केट ब—ीज, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक वाहतूक नियोजन, कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरण, नाईट लॅडिंग सुविधा यातून कोल्हापूर शहराचा कायापालट करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी चौका-चौकात चार्जिंग स्टेशन, केएमटी साठी केंद्र सरकारच्या माध्यमातून कोल्हापूरला इलेक्ट्रिक बससाठी पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हद्दवाढ रोखली
स्वार्थी राजकारणासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हद्दवाढ रोखली आणि प्राधिकरणाची वाट लावली, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. पुण्यात 50 गावे हद्दवाढीत समाविष्ट होतात. मग कोल्हापुरात का नाहीत? असे ते म्हणाले.
माहिती घेऊन बोला
राजर्षी शाहू जन्मस्थळ विकासासाठी देवेंद्र फडणवीस यांनी 13 कोटी रुपये निधी दिला होता. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी माहिती घेऊन बोलावे, असा सल्ला त्यांनी दिला. भाजपने बाहेरून कार्यकर्ते आणल्याचे सतेज पाटील म्हणतात. पण भाजप म्हणजे आम्ही कुटुंब मानतो. तुम्हाला ही नाती कळणार नाहीत, असे ते म्हणाले.