६४ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पहिल्या सत्रात महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा धक्कादायक पराभव झाला. तर दुसऱ्या लढतीत कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने बीडचा अक्षय शिंदे याला अस्मान दाखवले. पृथ्वीराजने एकेरी पटाने अक्षय याच्यावर सहा विरुद्ध चार अशा गुणांच्या फरकाने विजय मिळवला.
दोस्तीतील कुस्तीत शेख ठरला सिकंदर
अमरावतीचा पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध वाशिमचा पैलवान सिकंदर शेख या जिगरी दोस्तांमध्ये माती गटात सेमी फायनलची कुस्ती झाली. हे दोघेही कोल्हापूर येथील गांगवेश तालमीत सराव करतात. त्यामुळे दोघांना एकमेकांचे डावपेच माहीत होते. या लढतीत सिकंदर शेख याने माऊली जमदाडे याला चितपट केले. या लढतीत सिकंदर याने ६ विरुद्ध १ गुणांनी विजय मिळवला.
महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर आऊट
महाराष्ट्र केसरीसाठी प्रबळ दावेदार समजला जाणारा २०१९ चा महाराष्ट्र केसरी विजेता नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. पुण्याच्या हर्षल कोकाटे यांनी एके पटावर ७ विरुद्ध ५ अशा गुणांनी हर्षवर्धनचा पराभव केला. त्यामुळे हर्षवर्धनला गादी गटातून सेमीफायनलमध्ये आपला गाशा गुंडाळावा लागला.