ताजी बातमी ऑनलाईन टीम
पाचवेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) या मोसमातील पहिल्या विजयाची प्रतीक्षा आता आणखी लांबली आहे. मुंबईला (MI) शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (Royal Challengers Bangalore) 7 गडी राखून पराभव स्विकारावा लागला. मुंबईचा पहिल्या 4 सामन्यातील हा सलग चौथा पराभव आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार (Suryakumar Yadav) यादवच्या नाबाद 68 धावांच्या जोरावर आरसीबीला (RCB) 152 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र अनुज रावतच्या (Anuj Rawat) शानदार अर्धशतकी खेळीमुळे मुंबईला सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागला. अनुज व्यतिरिक्त माजी कर्णधार विराट कोहलीनेही (Virat Kohli) आरसीबीसाठी शानदार खेळी खेळली.
तत्पूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने (MI) चांगली सुरुवात केली आणि पॉवरप्लेमध्ये एकही विकेट न गमावता 49 धावा केल्या. मात्र त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (26) बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. पुढच्या 13 धावा होईपर्यंत संघाने 5 विकेट गमावल्या. यानंतर काही वेळातच सहावी विकेटही पडली तेव्हा मुंबईची धावसंख्या केवळ 79 धावांवर होती. यानंतर सूर्यकुमार यादवने जयदेव उनाडकटच्या साथीने 7व्या विकेटसाठी 72 धावा जोडून मुंबईला 151 या सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. सूर्याने 37 चेंडूंच्या या खेळीत 6 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 68 धावा केल्या. मात्र यानंतर अनुज रावतने मुंबईकरांच्या स्वप्नांवर पाणी फेकले.
मुंबईने दिलेल्या 152 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि अनुज रावत यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 8 षटकांत 50 धावा जोडल्या. येथे 9व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर जयदेव उनाडकटने डू प्लेसिसची विकेट घेतली. मुंबई येथून परतीचा मार्ग तयार करेल अशी अपेक्षा होती. मात्र विराट कोहली आणि अनुज रावतच्या बेधडक खेळीने मुंबईला ही संधी दिली नाही. विजयाला काही धावा बाकी असताना अनुज आणि विराट बाद झाले. परंतु त्यानंतर दिनेश कार्तिक आणि ग्लेन मॅक्सवेलसारख्या फलंदाजांना सामन्यात काही खास करण्याचं काम उरलं नाव्हतं. दोघांनी जोरदार फटकेबाजी करत संघाला या सीझनमधील तिसरा विजय मिळवून दिला.