मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणात मंगळवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान, विदर्भात मात्र हवामान कोरडे राहून उष्णतेची लाट कायम राहील.
उत्तर भारतातील राजस्थान, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश या भागात गेल्या दीड महिन्यापासून तीव्र उष्णतेची लाट सुरू आहे. या भागाकडून राज्याकडे उष्ण वारे वाहत आहेत, तर दक्षिणेकडून राज्याकडे दमट वारे वाहत आहेत. या दोन्ही वार्यांची टक्कर महाराष्ट्रावर होत असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. आगामी तीन दिवसांत 12 ते 14 एप्रिलदरम्यान या भागात वादळी वार्या सह पाऊस, तर काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता आहे.
त्यातच उत्तर प्रदेश ते विदर्भपार करून मध्य प्रदेशाच्या काही भागाकडे द्रोणीय स्थिती आणि हवेच्या वरच्या भागात चक्रिय स्थिती सक्रिय आहे. याचाही परिणाम राज्यातील वातावरणावर होत असल्याने हा पाऊस पडत आहे.
कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांत जोरदार मेघगर्जना, विजांचा कडकडाट व गारपिटीसह पाऊस पडेल.