दोन समाजात तेढ निर्माण होईल असे संदेश सोशल मीडियावर ठेवणार्या दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार साक्री तालुक्यातील म्हसदी गावात घडला आहे. पोलीस व प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या प्रकारामुळे गावात तणावपूर्ण शांतता आहे.
म्हसदी गावात राहणाऱ्या समीर मुस्तफा आतार या युवकाने त्याच्या मोबाईलच्या स्टेटस वर आक्षेपाहर्य मजकूर ठेवला होता. या मजकुराची गावात चर्चा होत असतानाच सतिलाल महाराज देवरे यांनीदेखील द कश्मीर फाईल सिनेमा संदर्भात आक्षेपार्ह मेसेज टाकला. या दोन्ही घटनांमुळे गावातील हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. दरम्यान याच कारणामुळे म्हसदी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर दोन्ही गटाकडून काही तरुणांची गर्दी गोळा झाली. या दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाल्यामुळे गावात तणावाचे वातावरण तयार झाले.
दरम्यान या घटनेची माहिती कळाल्याने अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव साक्री पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार चव्हाण आणि पोलिस पथक तातडीने म्हसदी गावात रवाना झाले. या संदर्भात पोलिस हेडकॉन्स्टेबल शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार समीर मुस्तफा आतार, शब्बीर दादामिया शहा, अब्बास सुलेमान शहा, शाहबाज सिराज शहा, असिफ मुस्तफा मंसुरी, वसीम सुभान बेडसे ,अखिल पिंजारी तसेच सतिलाल महाराज देवरे, ज्ञानेश्वर सतिलाल देवरे, दिनेश सुरेश बेडसे, यश संजय देवरे, स्वप्नील किशोर देवरे, लोकेश अनिल भामरे, लोकेश संजय देवरे यांच्या विरोधात भादवि कलम 295, 143 ,147, 160 ,323 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.