ताजी बातमी ऑनलाईन टीम
फेरीवाल्यांना ते व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी रात्री त्यांचे सामान, साहित्य ठेवता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. फेरीवाल्यांनी कुठे व्यवसाय करायचा यासंदर्भातील नियम फेरीवाला धोरणानुसार ठरतील, असा स्पष्ट निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
न्यायमूर्ती एम. आर. शाह, आणि बी. व्ही. नागरथना यांनी हा निकाल दिला आहे. “मार्केटमध्ये एखाद्या फेरीवाल्याला हातगाडीवर व्यवसाय करण्याची परवानी ही फेरीवाला धोरणानुसार देता येते. पण या जागेवर रात्री सामान आणि साहित्य ठेवण्याचा हक्क सांगता येणार नाही,” असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मदनलाल विरुद्ध दिल्ली महापालिका आणि इतर अशी ही केस होती.
याचिकाकर्त्याने सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायायलात याचिका दाखल करून आपण ज्या ठिकाणी व्यवसाय करतो, त्याच ठिकाणी रात्री सामान आणि साहित्य ठेवण्याची परवानगी मिळावी आणि तसे आदेश दिल्ली महापालिकेला द्यावेत, अशी मागणी केली होती. पण दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती.
“फेरीवाल्यांचा व्यवसाय फिरत्या स्वरूपाचा व्यवसाय आहे. त्यानुसार त्यांना परवानगी दिली जाते. रात्री साहित्य ठेवण्यासाठी परवानगी देणे हे फिरत्या व्यवसायाच्या स्वरूपाच्या विरोधात जाणार आहे,” असे उच्च न्यायालयाने म्हटले होते.
त्यानंतर याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा देत ही याचिका फेटाळून लावली आहे.