ताजी बातमी ऑनलाईन टीम
आयपीएल 2022 च्या मोसमात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. दिल्ली संघाच्या फिजिओनंतर संघातील आणखी एका खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर दिल्ली संघाला पुण्याला जाण्यापासून रोखण्यात आले असून संघातील सर्व सदस्यांना मुंबईतच क्वारंटाईन करण्यात आले आहे. दिल्लीचा पुढचा सामना 20 एप्रिलला पंजाब किंग्जविरुद्ध पुण्यात खेळायचा आहे. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार या सामन्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
16 एप्रिल रोजी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबतच्या सामन्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मात्र, त्याच्याशिवाय कोणत्याही खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. यानंतर १६ एप्रिलला दिल्लीचा संघ बेंगळुरूविरुद्ध मैदानात उतरला. दरम्यान, खबरदारी म्हणून त्या सामन्यात आरसीबीविरुद्धच्या सामन्यात खेळाडूंना एकमेकांना मिठी मारण्यास आणि हस्तांदोलन करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आले होते. पण आता पुन्हा दिल्ली संघासाठी एक वाईट बातमी समोर आली असून संघातील खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे. (IPL Corona)
कडक बायोबबल असूनही दिल्ली टीममधील एका खेळाडूची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे संपूर्ण टीमला हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलं. 20 एप्रिल रोजी दिल्लीची पुढची मॅच आहे. तोंडावर मॅच असताना खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याने दिल्ली टीमचं टेन्शन वाढलं.
आयपीएलच्या 14 व्या हंगामाला कोरोना फटका…
गेल्या वर्षी एप्रिल-मेमध्ये खेळल्या जात असलेल्या आयपीएलच्या 14 व्या हंगामात 3 दिवसांत 3 संघांचे 4 खेळाडू, 2 प्रशिक्षक आणि 2 इतर कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल केवळ 29 सामन्यांनंतर थांबवण्यात आले होते. नंतर, आयपीएलचे उर्वरित 31 सामने ऑक्टोबरमध्ये यूएईमध्ये खेळले गेले. (IPL Corona)
सर्वात पहिला कोलकाता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्तीसह दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली, त्यानंतर कोलकाता आणि बंगळुरू यांच्यातील सामना पुढे ढकलण्यात आला. केकेआरच्या सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या संपूर्ण संघाला क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजीसह चेन्नई सुपर किंग्जच्या तीन सदस्यांनाही कोरोना झाला. (IPL Corona)
त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादचा वृद्धीमान साहा देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच वेळी दिल्ली कॅपिटल्सचा अमित मिश्रा देखील पॉझिटिव्ह आला. याशिवाय दिल्लीतील स्टेडियममधील काही कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर आयपीएल थांबवण्यात आले होते. (IPL Corona)