कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणांतर्गत भूसंपादनासाठी रुपये 212.25 कोटी रुपयांच्या निधीला सोमवारी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शक्ती प्रदत्त समितीच्या (हाय पॉवर कमिटी) बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे येत्या काही दिवसांत हा निधी उपलब्ध होणार आहे. ही माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
कोल्हापूर विमानतळ हे भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांच्या अधिपत्याखाली आहे. विमानतळावरून उडान योजनेंतर्गत हवाई वाहतूक सुरू आहे. हे विमानतळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी विस्तार आवश्यक आहे. त्यासाठी 25.91 हेक्टर आर क्षेत्र जमिनीचे संपादन आवश्यक असून त्याकरिता निधीची आवश्यकता होती. आजच्या बैठकीत भूसंपादनासाठी 212 कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. कोल्हापूरच्या विकासाच्या द़ृष्टीने ही महत्त्वपूर्ण बाब असून कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी विमानतळाचा होत असलेला विस्तार महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी यापूर्वी 53 कोटी रुपये एवढ्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी उर्वरित 26 कोटी रुपये इतका निधी दिनांक 21 मार्च 2022 रोजी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित केला आहे. विस्तारीकणाच्या पुढील निधीसाठी जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांनी रुपये 212.25 कोटी रुपयांचा प्रस्ताव प्रशासकीय व वित्तीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर केला होता. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली विमानचालन संचालनालयाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर आदी उपस्थित आज झालेल्या बैठकीत त्याला मान्यता देण्यात आली.