Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरकेंद्रीय यंत्रणांच्या वापराने विरोधकांचा आवाज दबणार नाही : शरद पवार

केंद्रीय यंत्रणांच्या वापराने विरोधकांचा आवाज दबणार नाही : शरद पवार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

दोन वर्षांपूर्वी कोणाला माहीत नसलेली ‘ईडी’ आता घराघरांत माहीत झाली आहे. वेगळ्या विचारांचे सरकार केंद्रात आल्यानंतर ‘ईडी’, ‘सीबीआय’, ‘एनसीबी’ यासारख्या केंद्रीय संस्थांचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही, याचे भान केंद्र सरकारने ठेवावे, असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.



राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या राज्यव्यापी परिवार संवाद यात्रेचा समारोप येथील तपोवन मैदानावर झाला. यावेळी झालेल्या विराट संकल्प सभेत ते बोलत होते.


पवार म्हणाले, सत्ता मिळाल्यानंतर पाय जमिनीवर ठेवायचे असतात. सत्ता डोक्यात जाऊ द्यायची नसते. समाजाच्या कल्याणाचा विचार करायचा असतो. शेवटच्या माणसाला न्याय देण्याचा विचार करायचा असतो; पण गेल्या काही दिवसांत एक वेगळा विचार रुजविला जात आहे. 2014 पर्यंत डॉ. मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते, त्याकाळात देशात एक विचाराने निर्णय घेतले जात होते.

सत्तेचा गैरवापर नको

देश एकसंध कसा राहील, सामान्य माणसाचे प्रश्न कसे सुटतील, ही जबाबदारी सत्ताप्रमुखाची असते. 2014 साली भाजपच्या हाती सत्ता आली आणि वेगळे चित्र दिसू लागले. सत्ता येते आणि सत्ता जाते; पण सत्तेचा गैरवापर करायचा नसतो. राष्ट्रवादी काँग्रेस असो अथवा अन्य विरोधी पक्ष असोत, केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न यशस्वी होतो, अशी जर त्यांना खात्री वाटत असेल, तर ते मूर्खाच्या नंदनवनात राहत आहेत, असेच म्हणावे लागेल, असे ते म्हणाले.

सांप्रदायिक विचार खड्यासारखे बाजूला करा

सत्ता कशी वापरायची नसते, हे सत्ताधारी पक्षाकडून मिळणार्‍या वागणुकीवरून दिसते. यामुळे लोकशाही मानणार्‍या सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सांप्रदायिक विचार पेरत आहेत. त्यांचे हे विचार खड्यासारखे बाजूला केले पाहिजेत. देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्यासह सर्वसामान्य माणूस सुखावलेला दिसला पाहिजे. याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली आहे. त्याला तुम्हा सर्वांची साथ हवी, असे आवाहनही त्यांनी केले.

दिल्ली ही देशाची राजधानी आहे. तिथे केजरीवालांचे सरकार आहे. मात्र, त्यांचे गृह खाते अमित शहा यांच्याकडे आहे. ही दिल्ली एकसंध राहण्याची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. मात्र, ते घेत नाहीत. तिथे जाळपोळ सुरू आहे. हिंसाचार सुरू आहे. दिल्लीचा संदेश संपूर्ण जगभर जातो. यांना दिल्ली सांभाळता येत नाही आणि देशात सर्वकाही ठीक नाही, असा संदेश जात असल्याची टीकाही पवार यांनी केली. अशीच परिस्थिती ज्या-ज्या राज्यांत भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी असल्याचे त्यांनी सांगतिले.

संकुचित विचार

ज्यांच्याकडे देशाची सत्ता असते त्यांनी देशातील सर्व प्रांतांचा विचार करायचा असतो. यापूर्वीही देशात अन्य देशांचे नेते येत होते. ते कधी मुंबई, बंगळूर, हैदराबाद, कोलकाता अशा शहरांत जात होते. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आले. ते गुजरातला गेले, चीनचे राष्ट्राध्यक्ष आले तेही गुजरातला गेले. दोन दिवसांपूर्वी इंग्लंडचे पंतप्रधान आले तेही गुजरातला गेले. ते गुजरातला गेले याबद्दल आपल्या मनात यतःकिंचितही वेगळी भावना नाही; मात्र इतका संकुचित विचार यापूर्वी देशात कधी दिसला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
आज अनेक संघर्ष करावे लागत आहेत. अनेक नवीन आव्हाने आहेत; मात्र कोल्हापूरच्या जनतेला अंतःकरणापासून अभिवादन करतो. कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत कोल्हापूरच्या राष्ट्रप्रेमी जनतेने चुकीच्या प्रचाराला योग्य धडा शिकविण्याचे काम केले. निवडणुकीत मत मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. मात्र, विद्वेष वाढेल अशा एका ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटातील अत्याचार दाखवून संघर्ष वाढवायचा आणि त्यातून मताचा जोगवा मागायचा, हा हेतू होता. जेव्हा ही घटना घडली तेव्हा देशात भाजपच्याच पाठिंब्यावर व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते. गृहमंत्री आणि त्यावेळी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्रीही त्यांच्याच पाठिंब्यावर होते. जे घडले त्याचा गैरप्रचार करून माणसामाणसांत भेद वाढविण्याचे काम त्यांनी केले. मात्र, ते कोल्हापूरच्या जनतेने मान्य केले नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरच्या जनतेने राज्यातच नव्हे, तर देशात एक वेगळा संदेश दिला आहे, असे ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -