राज्यातील हवामान गुंतागुंतीचे असणार आहे. कुठे उष्णतेच्या लाटा तर कुठे पाऊस अशी परिस्थिती महाराष्ट्रात असणार आहे. तर दक्षिण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये 25-27 एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता IMD ने दिली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या भागात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. मात्र याच 5 दिवसांच्या काळात मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार असल्याचे अंदाजही सांगण्यात आले आहेत.
पुणे जिल्हा आणि रायगड येथील भागामध्ये सोमवारी तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे सोमवार आणि मंगळवारी ढगांच्या गडगडाटीसह पाऊस पडेल. त्याचवेळी सोमवार ते गुरुवार या दरम्यान सातारा, सांगली, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तर कोल्हापूरमध्ये बुधवारपर्यंत, नांदेडमध्ये बुधवार आणि गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तसेच बीड-परभणीमध्ये गुरुवारी पाऊस पडू शकतो.
कोकण भागात या हवामानाच्या अलीकडे कोपलेल्या स्थितीमुळे उरला सुरला जो काही आंबा, काजू हाता तोंडाशी आला होता त्याची मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाने दैना उडाली बागायतदार मेटाकुटीस आला आहे. दरम्यान काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार असल्याचे अंदाजही हवामान विभागाने दिले आहेत. 25 ते 27 एप्रिलपर्यंत विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळसह, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार आहे.