देशाच्या काही राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने खबरदारी म्हणून काही राज्यात मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. अशात चंडीगड जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. शाळा, महाविद्यालय, चित्रपट गृह आणि सरकारी-खासगी कार्यालयात मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. केंद्र शासित प्रदेशच्या प्रशासकाने जारी केलेल्या आदेशानुसार, मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे.
काय आहे गाईडलाईन्स…?
सरकारी आदेशानुसार चित्रपट गृह, शॉपिंग मॉल, डिपार्टमेंटल स्टोअर, दुकाणे, शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, पुस्तकालय, सरकारी आणि खासगी कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, सार्वजनिका वाहतूक- बसेस, टॅक्सी, ऑटो रिक्षात मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय सार्वजनिक कार्यक्रम त्यात धार्मिक, राजकीय मेळाव्यात मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्याकडून 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे.
दुसरीकडे, हरियाणात मनोहर लाल खट्टर सरकारने कोरोना बूस्टर डोसबाबत मोठी घोषणा केली आहे. राज्यात 18 ते 59 वर्षांच्या नागरिकांना मोफत बूस्टर डोस दिला जाणार आहे. सर्व सरकारी सेंटर्सवर कोरोना बूस्टर डोस मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.
हरियाणा सरकारने जारी केलेल्या निर्देशानुसार, राज्यात कोरोना बूस्टर डोस मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. पात्र लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. बूस्टर डोसचे मुल्य 250 रुपये होते. मात्र, आता बूस्टर डोस अगदी मोफत मिळणार आहे. राज्यात 18 ते 59 वर्षांच्या नागरिकांची संख्या जवळापास 1.2 कोटी आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 300 कोटी रुपये अतिरिक्त भार पडणार आहे. मात्र, हा खर्च कोविड मदत निधीमधून करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी राज्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. ते म्हणाले, कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांना मास्क वापरावे. हात वारंवार स्वच्छ करावे. सोशल डिस्टंसिंगचा वापर करावा. गर्दी करू नये. कोरोनाच्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालण करावे.