भरधाव वेगातील टेम्पोने धडक दिल्याने आजोबांसोबत दुचाकीवर जात असलेल्या एका नातवाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
रविवारी (दि. 24) सकाळी दहाच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर वल्लभनगर, पिंपरी येथे हा अपघात झाला. इजान असे मृत्यू झालेल्या नातवाचे नाव आहे.
तर सैफ हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी इकबाल अब्दुल कादर शेख (55, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टेम्पो चालक इंद्रजीत कुमार साकेत (26, रा. हिंजवडी) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या दोन नातवांना घेऊन फुगेवाडी येथून दुचाकीवरून जात होत्या. दरम्यान, जुना पुणे-मुंबई महामार्गावर वल्लभनगर येथील शेल पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या दुचाकीला आरोपीच्या टेम्पोने जोरात धडक दिली.
यामध्ये फिर्यादी आणि त्यांचे दोन्ही नातू खाली पडले. यामध्ये इजान याचा मृत्यू झाला. तर सैफ हा गंभीर जखमी झाला आहे.