अकोला जिल्ह्यातील 3 रस्त्यांच्या कामात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी 1 कोटी 95 लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली होती. याप्रकरणी तपास करुन बच्चू कडू यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचा आदेश अकोला न्यायालयाने पोलिसांना दिला होता.
अकोला न्यायालयाच्या आदेशावरून बच्चू कडू यांच्याविरुद्ध बुधवारी (ता. 27) सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात विविध पाच कलमांअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय.
प्रकरणात नवा ट्विस्ट
अकोल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी 11 मार्चला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना एक अहवाल दिला. त्यात त्यांनी बच्चू कडू यांना ‘क्लिन चिट’ दिल्याचं दिसतं. त्यांच्या अहवालात नेमकं काय म्हटलंय, हे जाणून घेऊ या..
रस्त्यांच्या कामात बच्चू कडू यांनी आर्थिक अपहार केल्याच्या प्रकरणात कडू यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याइतपत पुरावे नाहीत.
पालकमंत्र्यांनी खोटा दस्तावेज खरा भासवून जिल्हा परिषदेची कोणतीही दिशाभूल केल्याचे दिसत नाही. तसे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत.
‘वंचित’च्या तक्रारीनुसार, लेखाशिर्ष 3054 आणि 5054 अंतर्गत नमूद केलेल्या मुद्द्यावरच शासन निर्णयानुसार नियमातच हे काम झाल्याचं अहवालात म्हटलं आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने याप्रकरणी 3 डिसेंबर 2021 रोजी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. मात्र, या तक्रारीवरुन पोलिसांनी बच्चू कडू यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल न केल्याने ‘वंचित’तर्फे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली..