ताजी बातमी ऑनलाईन टीम
गेल्या काही दिवसांपासून बॅकफूटवर असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कडक आदेश दिला आहे. आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांशी चर्चा केली. चर्चेचा केंद्रबिंदू अर्थातच भाजप आणि मनसे होता.
या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आणि पक्ष प्रवक्त्यांना भाजप आणि मनसेवर तुटून पडा, असा आदेशच दिला आहे. त्यांनी राज ठाकरे यांच्यावरही तोंडसुख घेत बाबरी मशीद पडली तेव्हा राज कुठे होते ? अशी विचारणा बैठकीत केली. भाजपकडून होत असलेल्या आरोपांवर चोख प्रत्यूत्तर द्या, तसेच सरकारने केलेली कामे लोकांपर्यत पोहोचवा असा आदेशही त्यांनी पक्षाच्या खासदारांशी बोलताना दिला.
भाजप आणि मनसे पक्षाचं हिंदुत्व कसं बोगस आहे हे लोकांना दाखवून द्या, असेही त्यांनी या बैठकीत सांगितले. भाजप आणि मनसेकडून होत असलेल्या हिंदुत्वाच्या कोंडीवरून त्यांनी त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. आज खासदारांना दोन्ही पक्षावर तुटून पडण्याचा आदेश दिल्यानंतर उद्या (ता.३०) शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीतही तोच आदेश देण्याची शक्यता आहे.