मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत जाहीर सभा होणार आहे. सभेची तयारी जोरात सुरू आहे. राज यांच्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे आज औरंगाबादकडे रवाना होणार आहे. तत्पूर्वी राज यांनी पुण्यातील निवास स्थानी धार्मिक विधी केले. 150 पुरोहितांकडून गणेश पूजन करवून घेत औरंगाबादेतील सभा निर्विघ्न पार पडण्यासाठी आशीर्वाद घेतला. सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर राज ठाकरे शेकडो मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह औरंगाबादकडे रवाना होणार आहे. दुसरीकडे, औरंगाबादेत राज ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी मनसे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. राज ठाकरे यांचे जंगी स्वागत होणार आहे.
राज ठाकरे यांच्या पुण्यातील निवासस्थानी शनिवारी सकाळपासून पुरोहितांची मंदियाळी जमली आहे. जवळपास 100 ते 150 पुरोहितांकडून गणेश पूजन, मंत्र पठण हनुमान चालीसा पठण करण्यात येत आहे. औरंगाबादेत होणाऱ्या सभेतील सर्व विघ्ने दूर होण्यासाठी राज ठाकरे यांनी घरी धार्मिक विधी केल्याचे समजते.
औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या सभेची जवळपास तयारी पूर्ण झाली आहे. राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या सह मनसेचे ज्येष्ठ नेते आज सायंकाळी औरंगाबादेत पोहोचणार आहेत. मनसे नेत्यांकडून सभा मैदानाची पाहणी करण्यात येणार आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या सभेसाठी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त राहाणार आहे. 8 डीसीपी, 15 एसीपी आणि 65 पीआय आणि 6 राज्य राखीव दलाच्या तुकड्या अशे सुमारे 2000 पोलिस बंदोबस्तासाठी तैनात राहाणार आहेत.