लक्ष्मीवाडी (ता .मिरज) येथील आरती अभिनंदन तळंदगे (वय २६) या विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्त्या केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता.२८) रात्री उघडकीस आला. माहेरच्या नातेवाईकांनी तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या केल्याचा आरोप केला. आरतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती अभिनंदन बाळू तळंदगे (वय ३३), सासू भारताबाई बाळू तळंदगे (वय ४९), सासरा बाळू आप्पासो तळंदगे (वय ५५ रा.सर्व लक्ष्मीवाडी) नणंद अश्विनी राहुल भोरे (रा.नांद्रे) यांच्या विरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दरम्यान मृत आरतीच्या केंपवाड (ता.अथणी) येथील संतप्त नातेवाईकांनी सासरी सुरू असलेल्या नविन घरासमोरच आरतीच्या चितेला अग्नी दिला.
पोलिसांनी दिलेली व घटनास्थळी मिळालेली माहिती अशी, केंपवाड येथील आरती व अभिनंदन यांचा विवाह २०१२ मध्ये झाला होता. विवाहानंतर आरती हीने माहेरहून पैसे आणावेत यासाठी सासरच्या मंडळींनी तगादा लावला होता. सासरच्या मंडळींची मागणी पुर्ण होत नाही म्हणून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू होता. आरतीच्या माहेरच्या लोकांनी तिचा छळ थांबवण्यासाठी तंटामुक्त समितीकडे तक्रार केली होती. काहीवेळा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यानंतर तिचा छळ थांबला नव्हता. आरती व अभिनंदन यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मोठा मुलगा चौथीत, मुलगी दुसरीत आणि लहान मुलगा अंगणवाडीत शिक्षण घेत आहे.आरतीच्या सासरी नविन घराचे बांधकाम सुरू करण्यात आले होते.
आरतीच्या भावाने नुकतेच शेत विकल्याने आलेल्या रक्कमेतील दोन लाख रूपयाची मागणी पती अभिनंदन व सासू भारताबाई यांनी केली होती. या संदर्भात आज माहेरकडील नातेवाईक व सासरची मंडळी यांच्यात बैठक होऊन निर्णय होणार होता. माञ त्या पुर्वीच आरतीचा मृतदेह रात्री शेजारील विहिरीत सापडला. आरतीचा मृत्यू झाल्याचे पाहून माहेरच्या मंडळींना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ लक्ष्मीवाडी येथे धाव घेतली.आरतीने आत्महत्या केली नसून तिची हत्या केल्याचा आरोप केला. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. मिरज ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरतीचा भाऊ सागर मुरगुंडे यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार आरतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती, सासू, सासरा व नणंद यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. पोलीसानी पती अभिनंदन व सासरा बाळू यांना राञी ताब्यात घेऊन अटक केली.दरम्यान मृत आरतीचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह माहेरच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. संतप्त नातेवाईकांनी तिच्या मृतदेहावर सासरी नविन बांधकाम सुरू असलेल्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शोकाकूल वातावरणात सासरच्या अंगणात चितेला अग्नी देण्यात आला.