ताजी बातमी ऑनलाईन टीम
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने रविवारच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सवर 91 धावांनी प्रचंड विजय मिळवून आपल्या चौथ्या शानदार विजयाची नोंद केली. त्यामुळे आता चेन्नईचे अकरा सामन्यांतून आठ गुण झाले असून दिल्लीला अकरा सामन्यांतून दहा गुणांवर समाधान मानावे लागले आहे.
चेन्नईने दिल्लीपुढे विजयासाठी 209 धावांचे प्रचंड लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य दिल्लीला अजिबात पेलवले नाही. त्यांचा सगळा संघ 17.4 षटकांत 117 धावा करून गारद झाला. त्यांचा भरवशाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने 19 धावा केलेल्या असताना त्याला माहीश तिक्षानाने पायचीत पकडले. श्रीकर भरत हाही 8 धावा करून बाद झाला. त्याला सिमरजीतसिंगने मोईन अलीकरवी झेलबाद केले.
त्यानंतर मिशेल मार्श आणि कर्णधार ऋषभ पंत यांनी तुफानी फटकेबाजी करून धावफलक हलता ठेवला. मात्र, त्यानंतर ठराविक अंतराने दिल्लीचे फलंदाज बाद होत गेले. त्यांनी हाराकिरी केली आणि त्यामुळे चेन्नईचा विजय सुकर झाला. चेन्नईकडून मोईन अली सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 3 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.