१२-१४ वयोगटातील सुमारे ३ कोटी मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. लसीकरण मोहिमेत मुलांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.
बारा ते चौदा वयोगटातील मुलांच्या लसीकरणास मार्चमध्ये सुरुवात झाली होती. १२ ते १४ वयोगटातील मुलांना ‘कॉर्बेव्हॅक्स’ ही लस दिली जात आहे. हैदराबाद स्थित बायोलॉजिकल ई कंपनीकडून कॉर्बेव्हॅक्स लस विकसित करण्यात आली आहे. २८ दिवसांच्या कालावधीत दोनदा ही लस दिली जात आहे. देशात १२ ते १४ वयोगटातील मुलांची संख्या ४.७ कोटी इतकी आहे.
देशव्यापी लसीकरणामुळे कोरोनाच्या ओमायक्रॉन लाटेचे (Omicron wave) संकट टळले असल्याची माहिती याआधी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Health Minister Mansukh Mandaviya) यांनी दिली होती. गतवर्षीच्या एप्रिल-मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती, त्यावेळी डेल्टा स्ट्रेनने असंख्य लोकांचा बळी घेतला होता. तिसरी ओमायक्रॉन स्ट्रेनची लाट डिसेंबर २०२१ पासून आली होती. पण डेल्टाच्या तुलनेत ही लाट सौम्य होती.
देशात आतापर्यंत लसीचे एकूण १९० कोटी ५० लाख ८६ हजार ७०६ डोस देण्यात आले आहेत. गेल्या एका दिवसात १३ लाख ९० हजार ९१२ डोस देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
कोरोना रुग्णसंख्येत घट
दरम्यान, देशातील कोरोना रुग्णसंख्येत घट झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,२८८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात १९,६३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दिवसभरात ३,०४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.