पाच राज्यांच्या निवडणूका झाल्यानंतर केंद्र सरकारकडून मागच्या दोन महिन्यात पेट्रोल, डीझेल, एलपीजी, सीएनजी यात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली. त्यानंतर भाज्यांचे, दुध व इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत. अशातच आता रिजर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवण्याची घोषणा केली. याचा परिणाम म्हणून गेल्या 2 दिवसात 4 ते 5 बँकांनी आपल्या कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत. मात्र या महागाईतही देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना गुड न्यूज दिली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या देशांतर्गत मुदत ठेवींवरील व्याजदरात (Domestic Bulk Term Deposits) वाढ केली आहे. यामध्ये बल्क मुदत ठेवी या 40-90 बीपीएसने वाढल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजपासून नवे दर लागू झाले आहेत.
एकूणच देशात आर्थिक अस्थिरतेचे वातवरण असताना एसबीआयने ही बातमी देऊन आपल्या ग्राहकांना आनंदाचा धक्का दिला आहे. बँकेने 7 ते 45 दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर तीन टक्क्यांवरच ठेवला आहे. तर 46 ते 179 दिवसांसाठी तो 3 टक्क्यांवरून 3.5 टक्के करण्यात आला आहे. 180 ते 210 दिवसांच्या कालावधीत ठेवींवरील व्याजदरात 40 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. 211 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर 3.3 टक्क्यांवरून 3.75 टक्के करण्यात आला आहे.