खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेच्या सदस्यपदाचा कार्यकाल ३ मे रोजी संपला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. याबाबतची माहिती संभाजीराजेंनी स्वतः ट्विट करत दिली आहे.
गेली ६ वर्षे ते राष्ट्रपती नियुक्त खासदार राहिलेले आहेत. त्यांची पुढील राजकीय भुमिका काय असेल, आगामी लोकसभा निवडणूक ते लढणार का अशा अनेक प्रश्नांवर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संभाजीराजेंनी फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
”मुंबई येथे देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा सदस्य म्हणून माझी निवड होण्यामागे त्यांचाही मोलाचा हातभार होता, याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले…” असे संभाजीराजेंनी ट्विट करत म्हटले आहे.
संभाजीराजे छत्रपती कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान. ते आपली राजकीय भूमिका १२ मे रोजी स्पष्ट करणार असल्याचे समजते. संभाजीराजे एकला चलो रे चा नारा देणार असल्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे. संभाजीराजेंना आपल्या पक्षात घेण्यासाठी काही राजकीय पक्ष प्रयत्नात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कोल्हापुरात बोलताना, संभाजीराजे यांच्यासोबत आपली कसलीही चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले आहे.