महाराष्ट्रात नव्हे तर देश विदेशात प्रसिद्ध असणारे कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांना मागील एका प्रकरणामुळे अडचणीला सामोरं जावं लागणार असल्याची बातमी समोर येत आहे. आपल्या आगळ्यावेगळ्या बोलण्याच्या शैलीने नेहमीच लोकांची मने जिंकणारे, प्रबोधन करणारे इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा त्यांच्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
पुण्यातील दोन व्यक्तींनी इंदुरीकर महाराज यांच्याविरोधात एक तक्रार दाखल केली असता त्या तक्रारीची दखल घेत दिव्यांग कल्याण आयुक्तांनी तक्रारीची चौकशी करून इंदुरीकर महाराज दोषी आढळल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, आशुने मागणी करत अकोला पोलीस अधीक्षकांना सांगितलं. याविषयी राजेंद्र वाकचौरे व दत्तात्रय भोसले यांनी ही तक्रार केली असल्याची माहिती आहे.
अकोला येथे झालेल्या कीर्तनात इंदुरीकर यांनी, “आपल्या कीर्तनाचे व्हिडीओ अपलोड करून आतापर्यंत चार हजार लोकांनी यू्ट्यूबवर कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यांच्यामुळेच मी अडचणीत आलो आहे. आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील. ” असे विधान केले होते, असे वाकचौरे व भोसले यांचे म्हणणे आहे. इंदुरीकर यांच्या या वक्तव्यामुळे दिव्यांग व्यक्तींच्या भावना दुखावल्या असल्याने दिव्यांग व्यक्ती हक्क कायद्यानुसार हा गुन्हा आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी असे निवेदन व तक्रार त्यांनी दिव्यांग कल्याण आयुक्तांकडे केली आहे.
दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी याची दखल घेतली असून त्यानुसार त्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत आणि अकोले पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी तक्रारीची प्रत जोडून या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना अकोला पोलीस अधीक्षकांना दिली आहे. ज्या ठिकाणी इंदुरीकरांचं कीर्तन झालं त्या ठिकाणच्या आसपास विचारणा करावी. चौकशी पूर्ण झाल्यानंतर इंदुरीकर महाराज दोषी आढळल्यास दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 92(अ) नुसार त्यांच्यानुसार लवकर गुन्हा दाखल करावा, अशी कारवाई करण्याची मागणी करत आदेशही देशमुख यांनी दिला आहे.