रेल्वे प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या कारण यापुढे रेल्वे प्रवास करताना तुम्हाला कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. देशामध्ये पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी पुन्हा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रेल्वे प्रवास करताना प्रवाशांनी मास्कचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे मंडळाचे कार्यकारी संचालकांनी सर्व रेल्वे झोनच्या मुख्य व्यवस्थापकांना पत्राद्वारे यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. सर्व रेल्वे प्रवाशांना मास्क लावला असेल तरच रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जाणार आहे. त्याचसोबत रेल्वे गाड्या आणि स्थानक परिसरात प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. तसंच, रेल्वे कर्मचाऱ्यांना देखील मास्कचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत रेल्वेकडून जनजागृती मोहिमही राबविण्यात येणार आहे.
सध्या राज्यात मास्कसक्ती नाही. पण कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. अनेक राज्यांमध्ये रुग्णसंख्या देखील वाढू लागली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी घेत वेळीच मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मध्य, पश्चिम रेल्वेकडून उद्घोषणांद्वारे प्रवाशांना मास्क घालण्याचे आवाहनही केले जाणार आहे. तसंच, मास्क न घालणाऱ्यांवर, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर रेल्वेकडून कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांनी कोरोना नियमांचे पालन करत मास्कचा वापर करावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.