राजस्थानमधील उदयपूरमध्ये आजपासून काँग्रेसचे तीन दिवसीय चिंतन शिबीर सुरू होत आहे. दरम्यान, पक्षांतर्गत आमूलाग्र बदलांसाठी काही खास अटी आणि नियमांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये वयाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. याशिवाय एका कुटुंबातील किती जणांना तिकीट देता येईल, यावरही पक्षात चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कुटुंबात एकच तिकीट देण्यावर एकमत झाले आहे. मात्र, गांधी परिवाराला सवलत दिल्याची चर्चा आहे. उदयपूरमध्ये पक्षाचे नेते या मुद्यांवर विचारमंथन करतील, असे मानले जात आहे.
चिंतन शिबिराची सुरुवात आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भाषणाने झाली. यानंतर सहा वेगवेगळ्या गटांतील नेते चर्चा करतील आणि त्यानंतर काढलेल्या निष्कर्षाला काँग्रेस कार्यकारिणी १५ मे रोजी ‘नवीन ठराव’ म्हणून मान्यता दिली जाईल.
शिबिराच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच १५ मे रोजी राहुल गांधी शिबिराला संबोधित करणार आहेत. पाच राज्यांतील निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसची ही बैठक होत आहे. निवडणुकीतील पराभवामुळे “अनपेक्षित संकटाचा” सामना करणाऱ्या काँग्रेस नेत्यांसह ४०० हून अधिक पदाधिकारी, पक्षाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शुक्रवारपासून उदयपूरमध्ये तीन दिवस विचारमंथन करतील.
महत्त्वपूर्ण निवडणुकांपूर्वी काँग्रेसने सुरू केलेल्या सुधारणांच्या प्रयत्नांदरम्यान, पक्ष कमाल कार्यकाळाव्यतिरिक्त राज्यसभा सदस्यांसाठी किमान वयोमर्यादेवर चर्चा करत आहे. या चिंतन शिबिरात पक्षातील किमान निम्मी पदे ५० वर्षांखालील नेत्यांसाठी राखीव मानली जातील, असे मानले जात आहे.
पक्षश्रेष्ठींच्या म्हणण्यानुसार हे प्रस्ताव चिंतन शिबिरात विचारमंथनासाठी खुले ठेवण्यात येणार असून त्यावर विचारमंथन सत्रात अधिक चर्चा केली जाणार आहे. राहुल गांधींचे निष्ठावंत आणि तेलंगणाचे सरचिटणीस माणिक टागोर म्हणाले, “पक्षाने तरुणांना प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे कारण भारतातील ६० टक्के लोकसंख्या ४० वर्षांपेक्षा कमी आहे. त्याची अंमलबजावणी देखील करावी लागेल.”
पक्ष पुनरुज्जीवन योजनेचा भाग म्हणून “एक कुटुंब एक तिकीट” नियम लागू करू शकतो. नुकत्याच झालेल्या CWC बैठकीतही या वादग्रस्त नियमावर चर्चा झाली आहे.