नागपूर रेल्वे स्थानकावर जिवंत स्फोटके सापडल्याची घटना ताजी असतानाच पुण्यामध्ये सुद्धा अशीच घटना घडली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पुणे रेल्वे स्थानकावर जिलेटीनच्या कांड्या सापडल्याची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. या जिलेटिनच्या कांड्या पोलिसांनी तात्काळ निकामी करण्याची कारवाई सुरु केली आहे. या घटनेमुळे पुणे रेल्वे स्थानकावर सध्या भीतीचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘साडेदहा वाजता पुणे रेल्वे स्थानकावर संशयास्पद वस्तू सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जिलेटिनच्या कांड्या निकामी करण्याचे काम सुरु आहे. पुणे रेल्वे स्थानक परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक एक आणि दोन रिकामा करण्यात आला असून रेल्वे वाहतूक थांबवण्यात आलीय. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बॉम्ब शोधक पथकाने मोकळ्या जागेत बॉम्बसदृश्य वस्तू निकामी करण्यासाठी घेऊन गेले आहेत.
पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याची माहिती मिळताच अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुपारची वेळ असल्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी असते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ताबडतोब दोन प्लॅटफॉर्म रिकामे केले आणि पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या गाड्यांची वाहतूक सुद्धा थांबवली आहे. सध्या पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांना प्रवेश दिला जात नाही. जिलेटिनच्या कांड्या पोलिासांनी ताब्यात घेऊन त्या निकामी करण्यासाठी मैदानाच्या ठिकाणी नेण्यात आल्या आहेत. बॉम्ब शोधक पथकाच्या सहाय्याने संपूर्ण रेल्वे स्थानक परिसरासाची तपासणी केली जात आहे. त्याचसोबत ही वस्तू नेमकी आली कुठून याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.