ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्यात विविध निवडणुकांचे पडघम वाजत असताना आता कोल्हापूर महानगरपालिकेचे आरक्षण नुकताच जाहीर झाले आहे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली. मनपाने तयार केलेल्या रचनेत राज्य निवडणूक आयोगाने काही प्रमाणात बदल केले आहेत. गॅझेट प्रसिद्ध झाल्याने कोल्हापूर शहरातील लोकसंख्येनुसार आरक्षणही निश्चित झाले आहे. अनुसूचित जाती प्रवर्ग (एससी) साठी 12 व अनुसूचित जमाती प्रवर्ग (एसटी) साठी 1 जागेवर आरक्षण असेल. उर्वरित 79 जागा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी असतील. सर्व प्रवर्गातील 50 टक्के जागांवर महिलांचे आरक्षण असेल. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अनुसूचित जमातीसाठी निवडणुकीत आरक्षण मिळाले आहे. राज्य निवडणूक आयोग व मनपा लवकरच आरक्षण सोडत काढणार आहे.
शहराची लोकसंख्या सुमारे 6 लाख गृहीत धरून नगरसेवकांची संख्या 92 झाली आहे. त्यानुसार प्रभाग रचना तयार करण्यात आली आहे. प्रत्येकी 3 नगरसेवकांचा 1 याप्रमाणे 30 प्रभाग, तर 2 नगरसेवकांचा 1 प्रभाग, असे यंदाच्या महापालिका निवडणुकीत 31 प्रभाग असतील. पहिलीच निवडणूक आहे, असे गृहीत धरून प्रभाग रचना व आरक्षण निश्चित करावे, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार महापालिका प्रशासन शहरातील लोकसंख्येनुसार आरक्षण काढणार आहे. प्रत्येक प्रभागात आरक्षणासाठी अ, ब, क या क्रमाने अंतर्गत रचना असेल. त्यानुसार आरक्षण सोडत काढण्यात येईल. संबंधित प्रवर्गाची लोकसंख्या गुणिले शंभर भागिले प्रभागाची लोकसंख्या या सूत्रानुसार टक्केवारी काढण्यात येणार आहे. ही टक्केवारी उतरत्या क्रमाने घेतली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या गॅझेटनुसार एससी प्रवर्ग आरक्षणासाठी उतरत्या क्रमाने लोकसंख्या अशी – प्रभाग क्र. 30 (7 हजार 518), प्रभाग क्र. 4 (7 हजार 097), प्रभाग क्र. 19 (5 हजार 374), प्रभाग क्र. 1 (4 हजार 230), प्रभाग क्र. 13 (3 हजार 435), प्रभाग क्र. 28 (2 हजार 993), प्रभाग क्र. 9 (2 हजार 929), प्रभाग क्र. 7 (2 हजार 829), प्रभाग क्र. 18 (2 हजार 558), प्रभाग क्र. 21 (2 हजार 457), प्रभाग क्र. 15 (2 हजार 208). प्रभाग क्र. 5 (16 हजार 379). एसटी प्रवर्ग प्रभाग क्र. 2 (310). सर्वोच्च न्यायालय व राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षण वगळून निवडणूक होणार आहे.
महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. राजकीय पक्षही तयारीला लागले आहेत. इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी नेते व्यूहरचना करत आहेत. हमखास विजयी होणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जात आहे. आतापासूनच विविध राजकीय पक्षांचे कारभारी त्यांच्या संपर्कात आहेत. यामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या उमेदवारांचा समावेश आहे.येत्या काही दिवसांतच आरक्षण सोडत निघणार असल्याने आरक्षित प्रभागासह इतर प्रवर्गातील उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्याने रणधुमाळी सुरू झाली
आहे.
पहिल्यांदाच एसटीसाठी 1 जागा; महिलांसाठी 50 टक्के आरक्षण
अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग प्रभाग क्र. : 1,4,5,7,9,13, 15, 18, 19,21, 28, 30
अनुसूचित जमातीसाठी आरक्षित प्रभाग प्रभाग क्र. : 2 सर्वसाधारण प्रवर्गासाठीचे प्रभाग प्रभाग क्र. : 3,6,8,10,11,12,14, 16,17,20,22, 23, 24, 25, 26, 27, 29, 31
जात प्रवर्गनिहाय आरक्षण असे…
अनुसूचित जाती प्रवर्ग: 12 (पैकी 6 महिला) अनुसूचित जमाती प्रवर्ग: 1 (महिला किंवा पुरुष) सर्वसाधारण प्रवर्ग: 79 (पैकी 40 महिला)