ताजी बातमी ऑनलाईन टीम
सोलापूर; शरद पवार यांच्यावरील केतकी चितळे हिच्या पोस्टनंतर संपूर्ण महाराष्ट्रात तिच्यावर टीकेची झोड उठली. केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेचे नेते माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेचे समर्थन केले. यानंतर सोलापुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या समोर टाळ मृदंग वाजून निषेध नोंदविला.
शेतकरी आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने सदाभाऊ खोत हे सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी (दि.१६) दुपारी तीन वाजता सदाभाऊ खोत हे शासकीय विश्रामगृहावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी संवाद साधत असतानाच अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर, सुहास कदम, शहर युवक अध्यक्ष जुबेर बागवान, प्रतीक पवार, मकरंद शिवशेट्टी, मुसा अत्तार, इरफान शेख, युवराज राठोड, सरफराज बागवान, तौकिर शेरी, सादिक कुरेशी यांच्यासह काही कार्यकर्ते हातात टाळ मृदुंग घेवून खोत बसलेल्या खोलीत शिरले. तसेच चितळेंचे समर्थन केल्या बद्दल खोत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत ‘शरद अंगार है बाकी सब भंगार हे’ च्या घोषणा दिल्या. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.