२० वर्षीय तरुणीच्या डोक्यात रॉडने वार करत, गळा आवळून खून करण्यात आला. नारेगावातील राजेंद्रनगरात बुधवारी (दि. १८) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सायंकाळी साडेपाच वाजता हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, मृत तरुणीचा मित्र फोन बंद करून, गायब असल्याने त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेचा एमआयडीसी सिडको पोलिस अधिक तपास करीत आहेत.
रेणुका देविदास ढेपे (वय २०, रा. ब्रिजवाडी) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिच्या पश्चात आई-वडील, दोन विवाहित बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे. तिच्या भावाच्या तक्रारीवरून संशयित मित्र शंकर हागवणे (वय २५, रा. वाशीम) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी सांगितले, शंकर हागवणे हा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. तो २१ मार्चपासून नारेगावातील राजेंद्रनगर येथील वसंतराव बनगाळे यांच्या मालकीच्या घरात राहत होता. हागवणे याच्यासोबतच त्याचे तीन मित्रदेखील तेथेच राहतात. रेणुका ढेपे ही शंकरची मैत्रीण होती. ती अधूनमधून शंकरला भेटायला खोलीवर यायची. बुधवारी दुपारी देखील ती शंकरला भेटायला आली होती. ती आल्यावर इतर मित्र आपआपल्या कामाला निघून गेले. त्यानंतर शंकर व रेणुका हे दोघेच खोलीत होते.
दरम्यान, सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास ते मित्र खोलीवर आले, तेव्हा दरवाजा उघडाच होता. रेणुका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. त्यांनी तत्काळ घरमालक वसंतराव बनगाळे यांना माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविण्यात आला. सहायक पोलिस आयुक्त निशिकांत भुजबळ, विशाल ढुमे, पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे, सहायक निरीक्षक शिवाजी चौरे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह घाटीत हलविला.
मृत रेणुका ढेपे आणि आरोपी शंकर हागवणे हे मागील काही दिवसांपासून एकमेकांच्या चांगल्या ओळखीचे होते. रेणुका ही अनेकदा शंकरच्या खोलीवर यायची. गल्लीतील नागरिकांनी आणि शंकरच्या मित्रांनी ही माहिती पोलिसांना दिली. यावरून त्यांच्यात प्रेमसंबंध होते, हे स्पष्ट झाले. पोलिसांनी शंकरचा शोध सुरू केला आहे. मात्र, तो मोबाइल बंद करून गायब असल्याचे समोर आले. त्याच्या शोधार्थ तीन पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती गुन्हे शाखा निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली. आरोपीला पकडल्यानंतर नेमका प्रकार समजेल, असे पोलिस निरीक्षक पोटे म्हणाले.