महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे. 24 मे रोजी या राज्यसभा निवडणूकीची अधिसूचना जारी होऊन 13 जूनला ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यात संभाजीराजे छत्रपती हे राज्यसभेची सहावी जागा अपक्ष लढविणार आहेत. पण त्यासाठी संभाजी राजे छत्रपती यांना सर्वपक्षीय आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. मात्र अशातच आता हाती आलेल्या माहितीनुसार, संभाजी राजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अपक्ष आमदारांची वर्षा निवास्थानी बैठक बोलवली होती. या बैठकीसाठी छत्रपती संभाजीराजे वर्षा बंगल्यावर आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यामध्ये 35 मिनिटं चर्चा झाली.
या चर्चेत राज्यसभेच्या सहाव्या जागे संदर्भात चर्चा झाली. वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरण्याचा प्रस्ताव दिला. मात्र काही अटी सुद्धा टाकल्या आहेत.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. यातील पाच जागांपैकी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडे प्रत्येकी एक तर भाजपकडे दोन जागांवर निवडून येण्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ आहे. त्यामुळे सहाव्या जागेसाठी चुरस असून ही जागा आपण लढवणार असल्याचं संभाजीराजेंनी जाहीर केलं आहे.
माझी उमेदवारी शिवसेनेच्या सहकार्याने महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावी असा प्रस्ताव संभाजी राजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला. संभाजीराजे यांच्या या प्रस्तावावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार करून कळवतो असे सांगितलंय.