ताजी बातमी ऑनलाईन टीम
निटूर : विवाह सोहळ्यातील जेवणातून सुमारे ३०० व-हाडी लोकांना विषबाधा (Food poisoning) झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यांच्यावर निलंगा उपजिल्हा रूग्णालय व अंबुलगा बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.
काटेजवळगा येथील तरुणीचा देवणी तालुक्यातील जवळगा साकोळ येथील तरुणाशी रविवारी (दि. २२) केदारपूर येथे विवाह पार पडला. या विवाहासाठी केदारपूर, काटेजवळगा, अंबुलगा बु, सिंदखेड या गावातून व-हाडी आले होते. लग्न लागल्यानंतर भरपेट जेवण करून व-हाडी आपआपल्या गावी निघून गेले. मात्र, सायंकाळी ७ वाजल्यानंतर सगळ्यांच्या पोटात दुखायला लागले. पोट दुखणे, उलट्या, जुलाब असा त्रास सर्वांना सुरू झाला. निलंगा तालुक्यातील अंबुलगा उपजिल्हा रूग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले. तर काटे जवळगा येथील आरोग्य केंद्रात, तर काही जणांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
Food poisoning : वरणातून विषबाधा झाल्याचा संशय
ज्या लोकांनी वरण खाल्ले आहे. त्यांनाच विषबाधा झाली आहे. तर वरण न खाणाऱ्या व-हाडींना काहीही त्रास झालेला नाही. लहान मुलांना याचा मोठा त्रास होऊ लागला आहे. अबुलगा बु येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र माकणे, कर्मचारी जगदीश सगर वहाडींवर उपचार करत आहेत. बाधितांच्या उलटीचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. सध्या बाधितांची प्रकृतीत सुधारणा होऊ लागली आहे. त्यांच्यात सौम्य लक्षणे जाणवत आहेत. तसेच आज (दि.२३) सकाळी आणखी नवीन १० रूग्ण दाखल झाले आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरू असल्याचे डॉ. माकणे यांनी सांगितले.