ताजी बातमी ऑनलाईन टीम
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सध्या कराचीत वास्तव्यास असल्याचा खुलासा दाऊदचा भाचा अलीशाह पारकरनं केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाला अलीशाहने दिलेल्या जबाबात हा खुलासा झाला आहे.
अलीशाह हा दाऊदची बहिण हसीना पारकरचा मुलगा आहे. अंमलबजावणी संचालनालयाकडून त्याची चौकशी सुरू आहे. चौकशीत त्याने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, दाऊद इब्राहिम हा माझा मामा आहे. तो सध्या पाकिस्तानातील कराचीमध्ये वास्तव्यास असल्याचे मी स्त्रोतांकडून आणि नातेवाईकांकडून ऐकले आहे. मी जन्माला येण्यापूर्वीच म्हणजेच 1986 नंतर दाऊद भारत सोडून गेला होता. 1986 पर्यंत डंबरवाला भवनच्या चौथ्या मजल्यावर तो राहत होता. मी त्याच्या संपर्कात नाही.
कधीकधी ईद, दिवाळी आणि इतर सणांच्या निमित्ताने दाऊदची पत्नी मेहजबीन दाऊद इब्राहिम माझी पत्नी आयशा आणि माझ्या बहिणींच्या संपर्कात असतात. व्हाईस कॉलवरुन त्यांचे बोलणे होते, असेही अलीशाह याने म्हटले आहे. दाऊद हा संयुक्त राष्ट्रानं घोषित केलेला दहशतवादी आहे. अनेक वर्षांपासून तो सुरक्षा यंत्रणेच्या रडावर आहे. आता त्याचा ठावठिकाणा समजल्याने सुरक्षा यंत्रणा काय पाऊल उचलतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.