ताजी बातमी ऑनलाईन टीम
नव्याने महानगरपालिका होऊ घातलेल्या इचलकरंजीत टोमॅटोचे दर गगनाला भिडले आहेत. आधीच महागाईने होरपळलेल्या आणि शहरातील व्यवसायाने मोडकळीस आलेल्या इचलकरंजी शहरात सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील होऊन बसले आहे. आणि दिवसागणिक महागाई आगडोंब उसळत आहे.
आज इचलकरंजी शहरात टोमॅटोचा बाजार मधील भाव प्रतिकिलो दर ८० ते १२० रुपये पर्यंत जाऊन पोहचला आहे. हा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. टोमॅटोची आवक प्रामुख्याने कर्नाटकमधील बेळगाव,संकेश्वर या भागातून होते.
पण मान्सूनपूर्व पावसामुळे उत्पादनात घट तसेच ठेवणीची अडचण निर्माण झाल्यामुळे टोमॅटोचे भाव कडाडले आहेत.
कर्नाटक मधून राज्यातील विविध जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक होत असते. यामध्ये टोमॅटोचा ही समावेश आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून हा पुरवठा दिवसेदिवस कमी होत चालला आहे. टोमॅटो हा नाशवंत असल्यामुळे पटकन खराब होतो तसेच मान्सूनपूर्व पावसामुळे टोमॅटोच्या ठेवणीला मर्यादा येत आहेत.
गेल्या आठवड्यात ६० रुपये प्रति किलो दराने आणि गेल्या महिन्यात साधारणपणे २० रुपये दराने मिळणारा टोमॅटो आता १२० रुपये झाल्याने गृहिणींच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. पाऊस सध्या बंद असला तरी लवकरच पुन्हा सुरु होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला असल्यामुळे टोमॅटो चे दर कमी होण्याची शक्यता तूर्तास दिसत नाही.