ताजी बातमी ऑनलाईन टीम
शहापूर येथे 26 मे रोजी बालविवाह होणार होता. अंगणवाडी सेविका, मदतनीस, मुख्य सेविका यांच्या मदतीने अल्पवयीन मुलीच्या आणि सज्ञान मुलाच्या पालकांचे प्रबोधन केले आणि त्यांना बालविवाह रोखण्यात यश आले, अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.
विवाह झाल्यानंतर खटल्याची न्यायालयात सुनावणी सुरू होईपर्यंत मुलगी 18 वर्षांपेक्षा नक्कीच मोठी होईल आणि मग काहीही शिक्षा होणार नाही, असा पालकांचा गैरसमज होता; मात्र बालविवाहाचा खटला कधीही अगदी मुलगी 30 वर्षांची झाल्यानंतर सुनावणीसाठी आली, तरीही प्रत्यक्ष बालविवाह झाला.
त्यावेळी मुलीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी असल्यास ही सुनावणी त्यावेळच्या अल्पवयीन मुलीच्या वयानुसार होते. यामध्ये दोन्हीकडील पालक, उपस्थित नातेवाईक, भटजी, मंगल कार्यालय मालक, फोटोग्राफर यासह फिर्यादी मधील सर्व आरोपींना रोख दंड आणि कारावास अशी शिक्षा होण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे, अशी माहिती दोन्हीकडील कुटुंबीयांना दिली. त्यानंतर मुलीला जुलै महिन्यात 18 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतरच विवाह करण्याची लेखी संमती पालकांनी दिली. अल्पवयीन मुलीला बालकल्याण समिती, कोल्हापूर यांच्याकडे सादर करण्यात आले. त्यांनी बंधपत्र लिहून समज दिली, असे ज्योती पाटील यांनी सांगितले.